जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर येथील रहिवाशी असलेल्या भदोरिया यांच्या घराच्या छतावर रात्री 7.30 ते 11 वाजताच्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दगड पडत आहे. त्यातच कुणीतरी अगरबत्ती व कुंकू लावलेले लिंबू फेकल्याने भदोरीया कुटुंब दहशतीत आले आहे. या प्रकारामुळे कायर गावात दहशत पसरली असून समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जात आहे. याबाबत भदोरिया यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली आहे.
कायर येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये भुपेंद्र भदोरिया हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. घऱाला लागूनच टिनाचे शेड आहे. 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या टिनाच्या छतावर काही दगड पडल्याचे त्यांना आढळले. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर पुन्हा ही घटना घडली. सातत्याने हे प्रकार होत असल्याने त्यांनी दगडफेक करणा-यांचा शोध घेण्यासाठी घराभोवती हॅलोजन लावले. मात्र एक दोन दिवसांच्या अवकाशानंतर दगडफेक सुरूच राहते. कधी सिमेंटचे दगड, कधी विट, तर कधी छतावर दगड पडतात. दगड पडल्यावर त्या दिशेने गेल्यास तिथे त्यांना कुणीही आढळून येत नाही.
रविवारी लिंबू फेकल्याने चर्चेला उधाण
दगडफेकीची घटना सुरू असताना रविवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अगरबत्ती व कुंकू लावलेले लिंबू फेकले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. सदर घटना या रात्री 7.30 ते 10 वाजेच्या दरम्यानच घडतात. लिंबू फेकल्यापासून त्यांनी या वेळेत घरा शेजारी पहारा लावला आहे. मात्र दोन दिवसांपासून काहीही झाले नाही.
खोडसाळपणा करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न
माझे कुणाशीही शत्रूत्व नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुणीतरी समाजकंटक मला टारगेट करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस लवकरच या प्रकऱणाचा छडा लावेल व दहशत पसरवणा-यावर कार्यवाही करेल अशी आशा आहे. अशी प्रतिक्रिया भदोरिया यांनी वणी बहुगुणीजवळ दिली.
अंधश्रद्धेला बळी पडू नका !
दगडफेक करून कुणीतरी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. दगडफेकीमुळे खळबळ उडाल्यानंतर त्यातच कुणीतरी लिंबू फेकून खोडसाळपणा केला. त्यामुळे गावात भानामतीच्या चर्चेला ऊत आला. मात्र तसा काही प्रकार नाही. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांद्वारे करण्यात आले आहे.
Comments are closed.