विवेक तोटेवार, वणी: श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती पर्वानिमित्त वणी येथे तेली समाजाची भव्य प्रेरणा यात्रा उत्साहात पार पडली. श्री संताजी स्मृती पर्व निमित्त समिती, श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळ, श्री संताजी महिला विचार मंच, विदर्भ तेली समाज महासंघ, श्री हनुमान मंदिर देवस्थान व लाठी आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. हनुमान मंदिर बसस्टँड परिसरातून वणी शहरातील प्रमुख मार्गाने ही प्रेरणा यात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप संताजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात प्रबोधनात्मक कार्यक्रमाने झाला. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. समाजहितासाठी कार्य करणारे बदल पौर्णिमा शिरभाते व संतोष घाटोळे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. अध्यक्षस्थानी आमदार संजय दरेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय युवा संघटक प्रा. वैभवकुमार निमकर यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संताजी महाराजांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तेली समाजाची असल्याचे आवाहन त्यांनी केले.
स्मृती पर्वानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. नगराध्यक्ष विद्या आत्राम, नगरसेविका उषा डुकरे, सोनाली निमकर व नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य रवी बेलुरकर यांचा सत्कार करण्यात आला. स्व. कमलताई नीलकंठ पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतीश पिंपळे यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, तर स्व. कुसुमबाई दशरथ खापणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. अविनाश खापणे यांच्या वतीने ईसीजी तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात 25 युवकांनी रक्तदान केले. हा उपक्रम गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने राबविला जात असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मंडळाचे अध्यक्ष रमेश येरणे, सचिव धनंजय आंबटकर, महिला विचार मंचच्या अध्यक्षा सौ. नंदा, महासंघाचे संतोष डंभारे उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश येरणे यांनी केले. संचालन रवी आंबटकर, ओमप्रकाश निमकर, शैलेश अडपावार व प्रसन्न बुटले यांनी केले. आभार निखिल वैरागडे यांनी मानले.



Comments are closed.