सावधान… शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबेना !

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. रविवारी रात्री शहरातील टागोर चौक येथून एक स्प्लेंडर प्लस ही दुचाकी चोरीला गेली आहे. या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र कधी थांबणार? असा सवाल सर्वसामान्य वणीकर उपस्थित करीत आहे.

शाम नामदेव ढांगे (52) हे शहरातील टागोर चौक येथील रहिवासी असून ते पानपट्टी चालवतात. त्यांच्याकडे त्यांच्या जावयाने दिलेली स्प्लेंडर प्लस ही दुचाकी (MH29 G4438) असून रविवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी त्यांची दुचाकी नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. दुस-या दिवशी त्यांनी सकाळी उठून पाहिले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही.

दरम्यान त्यांनी जवळच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही चेक केले असता त्यांना रात्री पावने दोन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात ईसम त्यांची दुचाकी घेऊन जाताना आढळले. त्यांनी दुस-या दिवशी शहरात दुचाकीचा शोध घेतला मात्र त्यांना दुचाकी आढळून आली नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली.

दुचाकीचोरीचे सत्र थांबता थांबेना
शहरातील घरफोडी कमी झाल्या असल्या तरी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही कमी आली नाही. अनेक घरी पार्किंग किंवा गाडी ठेवण्याची जागा नसते. अशा वेळी ते अनेक वर्षांपासून दुचाकी घराबाहेर लॉक करून ठेवतात. अनेक लोक रात्री घराबाहेर दुचाकी लावतात. अशा दुचाकी चोरट्यांच्या रडारवर असून चोरटे अशा दुचाकी लंपास करीत आहे. दुचाकी चोरट्यांच्या धाकांमुळे वणीकर दहशतीत आले आहे.

या प्रकरणी वणी पोलिसांनी भादंविच्या कलम 379 नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. वणीतील सुरू असलेले दुचाकीचोरींचे सत्र कधी थांबणार असा? सवाल वणीकर उपस्थित करीत आहे.

Comments are closed.