शिवसेनाच मोठा भाऊ, वणी मतदारसंघ सेनेचाच !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद मोहितकर यांचा दावा

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभेची जागा आधीपासूनच शिवसेनेच्या क्वोट्यात होती. मात्र 2014 नंतर सर्व पक्ष वेगळे लढल्याने ही जागा भाजपकडे गेली. मात्र आता पुन्हा युती झाली आहे. आधीही शिवसेनाच मोठा भाऊ होता आणि आताही आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच राहणार. याबाबत पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार, असा दावा शिवसेना (शिंदे) सह संपर्क प्रमुख विनोद मोहीतकर यांनी केला आहे. राजकीय आढाव्याच्या या भागात शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या दाव्याबाबत चर्चा करणार आहोत.

लोकसभे नंतर आता विधानसभेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने तयारीला सुरूवात केली आहे. आघाडी आणि महायुतीत अजूनही कोणाला कोणत्या जागा मिळणार हे निश्चित नाही. पण इच्छुकांनी आपली तयारी मात्र सुरू केली आहे. शिवसेना (शिंदे) गटाने राज्यात 100 जागांची मागणी केली आहे. त्यातील 90 जागा सुटेल अशी आशा शिंदे गटाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात जागेवरून दावे प्रतिदाव्याला सुरुवात झाली आहे. वणी मतदारसंघात देखील याला जोमाने सुरुवात झाली आहे.

दाव्यामागची काय पार्श्वभूमी?
वणी विधानसभेची जागा ही युतीत शिवसेनेकडे होती. 2004 मध्ये या जागेवर शिवसेनेला विजय देखील मिळाला होता. तर 2014 मध्ये युती तुटल्यानंतर या जागेवर शिवसेना दुस-या क्रमांकावर होती. शिंदे गटाचा जिल्ह्यात दारव्हा, वणी व राळेगाव अशा 3 जागांवर दावा असून यातील किमान 2 जागा नक्की सुटणार. यातील दारव्हा ही जागा पक्की मानली जात आहे. तर दुसरी जागा वणी असणार, अशी आशा विनोद मोहीतकर यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिवसेनाच मोठा भाऊ – विनोद मोहीतकर
संपूर्ण जिल्ह्यात संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे काम सुरु आहे. वणी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. पदाधिकारी जोमाने काम करीत आहे. संजय राठोड यांनी नुकतेच आम्हाला विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिला. आधीही राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ होता. सध्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे आताही शिवसेनाच मोठा भाऊ आहे. वणी विधानसभेतही शिवसेनाच मोठा भाऊ राहिला आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा केवळ दावा नाही, तर ही जागा शिवसेनेलाच सुटणार, अशी शिवसैनिकांना आशा आहे.
– विनोद मोहीतकर, सहसंपर्क प्रमुख यवतमाळ, शिवसेना (शिंदे)

विनोद मोहीतकर यांचा राजकीय प्रवास
विनोद मोहीतकर हे वणीत शिवसेनेची स्थापन झाल्यापासून कार्यरत होते. ते यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख होते. शिवसेनेतर्फे 1994 व 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना वणी विधानसभा क्षेत्रात तिकीट देण्यात आले. मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. 2004 मध्ये विनोद मोहितकर यांच्या ऐवजी विश्वास नांदेकर यांना पक्षाने तिकीट दिले. तेव्हापासून ते राजकारणापासून दूर झाले. दरम्यान ते काही काळ काँग्रेसमध्ये देखील होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु दिवंगत आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते. तेव्हा मोहीतकर हे यवतमाळ जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे दिघे यांच्याशी मोहीतकर यांचे जवळचे संबंध होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी पुन्हा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश करत राजकारणाला पुनश्च सुरुवात केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या देखील जवळचे असल्याचे बोलले जाते. (राजकीय आढाव्याच्या पुढल्या भागात आणखी एका पक्ष, नेत्याविषयी…)

 

Comments are closed.