सीसीआय कापूस खरेदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्या

दुस-या वेच्याचीही खरेदी करा, तालुक्यातील शेतक-यांचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: सीसीआयमार्फत सुरू असलेल्या कापूस खरेदीची मुदत वाढवून 15 एप्रिलपर्यंत करावी, तसेच एल.आर.ए. ग्रेड सुरू करून दुसऱ्या वेच्याच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सोमवारी दिनांक 9 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने अलिकडेच हमी दराने कापूस खरेदीस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र यावर्षी वणी परिसरात अतिवृष्टीमुळे कापसाची वेचणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे कापूस उत्पादन अद्यापही सुरु आहे. अल्प मुदतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला कापूस सीसीआयमार्फत विक्रीसाठी आणणे शक्य होणार नाही, त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देऊन ती 15 एप्रिलपर्यंत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतक-यांच्या गाड्या परत पाठवू नका
वणी केंद्रावरील सीसीआय खरेदीदरम्यान कापसाचा दर्जा नसल्याचे कारण देत अनेक शेतकऱ्यांच्या गाड्या परत पाठविल्या जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात केवळ 5000 ते 6000 रुपयांच्या दराने कापूस विकावा लागत आहे. अत्यल्प दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे एल.आर.ए. ग्रेड सुरू करून दुसऱ्या वेच्याचा तसेच फरतड कापूसही खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना मधुकर लांडे, मनोज काळे, ईश्वर खाडे, रवि काळे, शत्रुघ्न मालेकर, गजानन राजूरकर, निखील नागोसे, रवि मोहीतकर, संतोष काकडे, सेनापती पावडे, गणेश मासीरकर, भारत धोबे, नितू ठेंगणे, विशाल गोवारदिपे, राहुल भोयर, प्रवीण येलपुलवार, संजय गोहोकार, रोहित पावडे, बाळू शेंडे, अनिल गोवारदिपे, प्रशांत मोहारे, अनिल जांभूळखर, अविनाश सोमलकर आदी शेतकरी उपस्थित होते.

 

Comments are closed.