लहानग्या हातांचा मोठा आदर्श: सायकल दानातून शिक्षणाला नवी दिशा
छोरियालेआऊटमधील विद्यार्थ्यांनी गरजू मुलांना दिला आधार
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील गणेशपूर परिसरात लहानग्यांनी मोठा आदर्श घालून दिला आहे. वणीतील छोरिया रेसिडेन्सी येथील गणपती रेसिडेन्सी विंग ‘बी’ मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वापरातील, दुरुस्तीयोग्य स्थितीत असलेल्या सायकली स्माईल फाउंडेशनला दान केल्या. या छोट्या हातांनी केलेल्या मोठ्या दानामुळे शिक्षणाच्या प्रवाहात मागे राहिलेल्या अनेक गरजू मुलांना नवी दिशा मिळणार आहे.
या उपक्रमासाठी प्रा. प्रवीण फटाले यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्यामुळेच या सायकली संकलित करून फाउंडेशनकडे पोहोचल्या. दुरुस्ती झाल्यानंतर या सायकली गरीब, अनाथ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. तर सायकल दुरुस्तीचा अर्धा खर्च संस्थेची सदस्य डॉ. विश्वास सुंदरानी यांनी उचलला आहे.
सायकल दान करण्यासाठी संपर्क साधा
स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांनी गावातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, शिक्षणासाठी सायकलची गरज असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. तसेच वणी शहरातील नागरिकांकडे दुरुस्त होऊ शकणाऱ्या चांगल्या स्थितीतील सायकली असल्यास त्या दान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
फाउंडेशनकडून सायकल दुरुस्तीचा संपूर्ण खर्च उचलला जाणार असून, घरून संकलनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमातून लहानग्यांनी समाजाला शिकवलेला धडा स्पष्ट आहे—दान केवळ पैशानेच नव्हे तर उपयोगी वस्तू देऊनही करता येते. शिक्षणासाठी पुढे सरसावलेले हे लहान हात समाजात आशेचा किरण पसरवत आहेत.



Comments are closed.