वणीत 3 लाखांची घरफोडी… दागिने, रोख लंपास

नागपूरला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विठ्ठलवाडी-वडगाव रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालीब अय्युब खान (वय 28, रा. विठ्ठलवाडी, वडगाव रोड, वणी) हे 22 मे रोजी घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले होते. 31 मे रोजी दुपारी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरट्यांनी तीन सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याचा गोप, एक सोन्याचा हार असा एकूण 37 ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध चांदीचे दागिने तसेच 80 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(3), 331(4) व 305(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करीत आहेत.

Comments are closed.