जैन ले आऊटच्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगरपालिका प्रशासननाने शहराला पाणी पुरवठा करताना अनियमितता आणि अनिश्चितेचा कळस गाठला आहे. पंधरवड्यापासून जैन ले आऊट वसाहतीत घरगुती पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्याची मागणी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या वणी नगरपालिकेचा कारभार प्रशासन पहात आहे. मात्र, शहराच्या मूलभूत समस्या दूर करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात घरगुती पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होत आहेत. कधी शुध्द तर बहुतांश वेळा अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो. नाईलाजाने नागरिकांना अशुद्ध पाण्याचा वापर करावा लागतो. कुठे चार दिवसांत ते कुठे आठ दिवस पाणी मिळत नाही.

पंधरवाड्यापासून पाणी पुरवठा ठप्प
जैन ले आऊट परिसरात तर पंधरवड्यापासून पाणी पुरवठा ठप्प आहे. परिणामी नागरिकांना महागडे पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागत आहे. उन्हातान्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. नगरपालिकेचा डोईजड पाणी कर भरूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर अधिकारी काय कामाचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. पाणी पुरवठ्या संदर्भात नागरिकांनी ठेकेदाराशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप आहे. परिणामी नागरिक नगरपालिका पाणीपुरवठा विभाग, संबंधित ठेकेदार आणि नगरपालिका अधिकारी यांचे विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. लोकभावना तीव्र होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर संतोष किलावत, विलास वांढरे, आर.डी.गोखरे, दत्तू महाकुलकर, नीळकंठ उरकुडे, विठ्ठल थाटे, मधुकर मोहितकर, पी.आर.पत्तीवार, सं.तू.म्हसे, गजानन खाडे, हेमचंद्र तिखट, निखिल खाडे, अनिल पिंपळकर, संजय तुराणकर, वैजनाथ खडसे, वामन मत्ते, विठ्ठल सातपुते, गौरव आसुटकर, शुभम सातपुते, भास्कर मत्ते, धनराज हिवरकर, शंकर ठावरी, सचिन लांडगे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Comments are closed.