टोबणीचे काम आटपून परतणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला

घोडदरा शिवारातील घटना... तीन जखमी, एका युवतीची प्रकृती गंभीर

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये फुलीबाद टोबणीचे काम आटोपून घरी परतत असलेल्या महिला मजुरांवर रानडुकराने हल्ला केला. यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. यात दोन युवती तर एक महिलेचा समावेश आहे. जखमीतील एका युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर वणी येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सदर घटना रविवारी दि. 3 जुलै रोजी सायंकाळच्या 5.30 च्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील गणेश जिवतोडे यांच्या शेतामध्ये फुलीबाद टोबणीचे काम सुरु आहे. शेतातून फुली बाद टोबनीचे काम आटपून घराकडे परतत असताना गावाजवळील दुमोरे यांच्या शेताजवळ रान डूकराने या महिलांवर पाठीमागून अचानक हल्ला केला. अकस्मात झालेल्या या हल्याने सगळे घाबरले आणि सैरावैरा पळायला लागले.

रानडुकराच्या या हल्ल्यात दुर्गा विठ्ठल नेहारे 18 वर्षे रा.घोडदरा ही युवती गंभीर जखमी झाली. तर कोमल गणेश जिवतोडे 16 वर्षे, आशाताई गणेश जिवतोडे 38 वर्षे या दोन जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी मुलीला वडील व गावांतील काही लोकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले आहे. तिथे तिच्यावर उपचार करून वणीला पुढील उपचारासाठी पाठविले आहे.

परिसरात हिस्र जनावरांचा वावर
परिसरात रानटी जनावारांची संख्या वाढत आहे. जनावर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. मात्र आता हे रानटी जनावर लोकांच्या जिवावर उठले आहे. तालुक्यात आजवर वन्य प्राण्यांच्या हल्यात अनेक जण जखमी झाले तर काहींना नाहक आपला जीवही गमवावा लागला आहे. काहींना अपंगत्वही आलेले आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वनविभाकडून रानटी प्राणाचा बंदोबस्त करावा व जखमी व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मुलीच्या वडील, गावकरी व परिसरातून करण्यात येत आहे.

Comments are closed.