एसीबीच्या कारवाईवर खुश होऊन मिठाई वाटणा-यांना अटक

परिसरात एकच खळबळ, पोलिसांची तुघलकी कारवाई असल्याचा आरोप

0 3,582

विवेक तोटेवार, वणी: दोन दिवसांआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना लाच घेताना अटक केली होती. या कारवाईवर खूश होऊन वणीतील काही इसमांनी तहसिल कार्यालयासमोर मिठाई वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या सर्वांना अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आणि पोलीस ठाण्याबाहेर बघ्यांची फार मोठी गर्दी जमली होती.

मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास फारुख चिनी व त्याच्या सोबत असलेले रमीज राजा, इरशाद शेख, शहफाज चिनी, नदीम पटेल हे एसीबीच्या कारवाईने खुश होऊन तहसील परिसरात लाडू वाटप करणार होते. याकरिता त्यांनी एका मालवाहतूक ऑटोवर भोंगा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अभिनंदन करत होते. कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर उपविभागीय पोलीस अधिकार्याचे कर्मचारी व डी बी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा ऍटो पोलीस ठाण्यात लावला. त्यापाठोपाठ अभिनंदनकर्ते ही पोलीस ठाण्यात गेले असता तिथे त्यांना अटक करण्यात आली.

महत्वाचे म्हणजे त्यांना ठाण्यात नेताच ठाण्याचे बाहेरचे गेट बंद करण्यात आले. हे बघून परिसरातील नागरिकांनी व राजकीय पुढार्यांनी एकच गर्दी केली. यातच वणीतील नामवंत वकील नीलेश चौधरी मध्यस्ती करीत गेले असता त्यांनाही ताब्यात घेण्यात आले मात्र काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले.

                                                                             पोलीस स्टेशनचे बंद असलेले गेट

नीलेश चौधरी याना सोडल्यानंतर पोलीस ठाण्याचे गेट उघडण्यात आले व दोन बंदूकधारी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यात आले. इतर पाच इसमावर सरकारी कामात अडथडा निर्माण करण्याच्या कारणावरून व सरकरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यावरून कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची कारवाई सूड भावनेतून: जब्बार चिनी
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे बंधू व पत्रकार जब्बार चिनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हणाले की माझ्या भावाला फसविल्या जात आहे. मागील एका घटनेचा वचपा पोलीस काढीत असून पोलीस दबंगगिरी करत आहे. एखाद्या खात्याने चांगलं कार्य केले असेल तर त्यांची प्रशंसा करून त्यांच्या कामगिरीवर मिठाई वाटणे हा काही गुन्हा नाही. परिसरात पोलिसांची अरेरावी वाढली असून हा प्रकार म्हणजे लोकशाहीची गळचेपी होय. जुन्या घटनेच्या वचपा काढण्यासाठीच पोलिसांनी जाणून बुजून सूड भावनेतून अटक केली. असा आरोपही त्यांनी केला. 

एका लाचखोर अधिका-यांला जर अटक होत असेल आणि त्याचा आनंद लोक मनवत असेल तर त्यात वावगं काय असा सवाल वणीकर उपस्थित करीत आहे. तसंच पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी लाचखोर भ्रष्ट अधिका-यांच्या पाठीशी उभं राहत आहे अशीही कुजबुज या निमित्ताने वणीत सुरू आहे.

mirchi
Comments
Loading...