क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात राडा, मुलावर चाकूने हल्ला

खरबडा परिसरातील घटना, एकमेकांविरोधात तक्रार दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत एका 15 वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. शनिवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान ही घटना झाली. या प्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, राहुल खेमराज मेश्राम (40) हा खरबडा मोहल्ला वणी रहिवासी आहे. तो परिसरातच विटभट्टा चालवतो. त्याच्या घराशेजारी अनिल विनायक येमुलवार (25) हा राहतो. तो विटभट्ट्यावर काम करतो. 15 दिवसांआधी त्याने राहुलचा भाऊ भुषण कडून 4 हजार रुपये उसणे घेतले होते. शनिवारी दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भुषण हा अनिलच्या घरी गेला व त्याने अनिलला कामावर येण्याबाबत विचारणा केली. मात्र अनिलने कामावर येत नाही आणि तुमचे उधार घेतलेले पैसे ही देत नाही, असे उत्तर दिले.
संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राहुल त्याचा मुलगा ओम, भुषण हे घरी होते. दरम्यान अनिल आणि त्याचा भाऊ अजय येमुलवार हे दारू पिऊन राहुलच्या घरासमोर आले. त्यांनी जोरजोरात शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावर राहुल आणि भूषण हे घराबाहेर आले व त्यांनी याबाबत विचारणा केली असता अजयने भूषणला मारहाण केली. त्याने भूषणच्या तोंडावर बुक्की मारल्याने त्याचा दात पडला. मारहाण सोडवण्यासाठी राहुलचा मुलगा ओम मध्ये गेला असता अनिलने त्याच्यावर चाकूने गळ्यावर वार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत ते तिथून निघून गेले. शेजा-यांनी जखमी झालेल्या ओमला आधी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याल चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
दुस-या तक्रारीवरून, अनिल याने काही दिवसांआधी विटभट्टीच्या कामासाठी 4 हजार रुपये ऍडव्हान्स घेतला होता. शनिवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अनिल हा पैसे परत करण्यासाठी राहुलच्या घरी गेला. घरी जाऊन त्याने 2 हजार रुपये परत केले. पण पूर्ण पैसे पाहिजे असे सांगून राहुल आणि भूषणने अनिलशी वाद घातला. या दोघांनीही शिविगाळ करीत मारहाण केली.
या प्रकरणी पहिल्या तक्रारीवरून आरोपी अनिल येमुलवार व अजय येमुलवार यांच्यावर भादंविच्या कमल 307, 323, 325, 34, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला तर दुस-या तक्रारीवरून आरोपी भूषण व राहुल यांच्या विरोधात भादंविच्या कलम 323, 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.