बुरांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा संशय

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीवर कर्जाचे ओझे असलेल्या एका शेतकऱ्याने स्वतःचे शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बुरांडा येथे घडली. गजानन नागो वासेकर वय 48 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह करायचे.

गजानन वासेकर यांच्याकडे 5 एकर शेती असल्याची माहिती आहे. ते याच शेतीवर आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचे. बेभरवशाचा पाऊस आणि सतत पडणारे ओले व कोरडे दुष्काळ यामुळे शेतकरी शेतीला वैतागले होते. अशातच त्यांच्यावर स्टेट बँक आणि सोसायटीचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे.

कर्जाच्या विवंचनेत असलेले गजानन हे नेहमीप्रमाणे शनिवारी दि. 19 मार्चला आपल्या शेतामध्ये गेले. मनात आत्महत्येचा विचार चालू होताच. अशातच न राहवून त्यांनी शेतामध्ये ठेऊन असलेले विष प्राशन केले. घरच्यांना ही बाब कळताच त्यांनी गजानन यांना प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व प्रकृती गंभीर असल्याने नंतर वणी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गजानन यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. सदर प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.