नेरड येथील शेतक-याला मिळाला एटीएम विम्याचा लाभ

अपघातात झाला होता मुलाचा मृत्यू.... विम्यासाठी दिलिप भोयर यांनी केला होता पाठपुरावा,

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नेरड (पुरड) येथील शेतकरी दाम्पत्य गंगाधर सोनपित्तरे व सुनंदा सोनपित्तरे यांना बँकेच्या एटीएम विम्याचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या मुलाचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले होते. एटीएम विम्याबाबत त्यांना माहिती नव्हती. मात्र श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी याबाबत पाठपुरावा करून सोनपित्तरे दाम्पत्यास 2 लाखांचा विमा मिळवून देण्यात मदत केली.

गंगाधर सोनपित्तरे व सुनंदा सोनपित्तरे हे नेरड येथील रहिवाशी आहेत. त्यांना संकेत नावाचा एक मुलगा होता. एकुलता एक असलेल्या या मुलाचा 1 ऑगस्ट 2021 रोजी मुकुटबन मार्गावर झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला होता. संकेत याने फिनो पेमेंट बँकेत खाते उघडले होते. त्या बँकेने संकेत यांना एक एटीएम कार्ड दिले होते. बँकेचे एटीएम कार्ड ग्राहकाला प्रधान करताच एटीएम धारकाला 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचा विमा मोफत मिळतो.

याचाच आधार घेत दिलीप भोयर यांनी विमा मिळवण्याबाबत सदर बँकेत पाठपुरावा केला. सदर बँकेने आधी याकडे दुर्लक्ष केले. मात्र सततच्या पाठपुराव्यनंतर विम्याचा लाभ सोनपित्तरे कुटुंबांना मिळाला. त्यांच्या अकाउंटमध्ये नुकतेच 2 लाखांची विम्याची रक्कम जमा झाली आहे. सोनपित्तरे कुटुंबीयांनी दिलिप भोयर यांचे आभार मानले. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, सुभाष परचाके आदि मान्यवर उपस्थित होते.

एटीएम कार्डधारकांना मिळतो 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचा मोफत विमा
एटीएम कार्ड जेव्हा ग्राहकांना मिळते. त्यावेळी बँक एटीएमचे काही शुल्क घेतात. या शुल्कातच ग्राहकांचा अपघाती विमा कव्हर केलेला असतो. मात्र अनेक एटीएम धारकांना याची माहिती नसते. त्यामुळे यावर क्लेम करणारे खूप कमी लोक असतात. यात एटीएमच्या प्रकारानुसार 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचा विमा कव्हर केलेला असतो. प्लाटीनम कार्डवर 5 लाखांचा विमा दिला जातो. आपघाती आलेले अपंगत्व तसेच अपघाती मृत्यू यासाठी हा विमा दिला जातो.

Comments are closed.