रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

राजकीय दबावामुळे मालक सोडून चालकावर गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापुर (मांगली) नाल्यावरून रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक करीत असताना महसूल विभागाने गुरुवारी ६ सप्टेंबरला सकाळी ६: ३० वाजता अचानक धाड टाकली. या धाडीत रेतीची अवैध वाहतूक करताना चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. मात्र यात मालक सोडून चालकाला ताब्यात घेतल्याने ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अशी चर्चा रंगत आहे.

हिरापुर (मांगली) नाल्यावरील रेती घाटावर खुलेआम व सर्रास अवैध रेती उत्खनन व वाहतूक करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यावरून आज सकाळी ६:३० वाजता दरम्यान मुकुटबन पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकली. .यात चारही ट्रॅक्टर चालकांकडे रायल्टी नसल्याने अवैधपणे रेतीची तस्करी करीत असल्याचे महसूल विभागाला आढळून आले. रेती चोरट्याने चारही ट्रॅक्टर मधील रेती घटनास्थळी खाली करून ट्रॅक्टर मांगली (ही.) चे पोलीस पाटील नामदेव सातघारे यांचे कडे सुपूर्द केले. चारही ट्रॅक्टरचा पंचनामा करून मुकुटबन पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करीता आणण्यात आले.

या कार्यवाहीत १२ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व चालकावर कलम ३७९ /(३४) अन्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यात ट्रॅक्टर क्रमांक MH-२९ C-७८७७ चालक सागर जुनघरे रा. मांगली, विनापरवाना ट्रॅक्टर चालक निलेश कुमरे रा.लिंगटी, ट्रॅकटर क्रमांक MH-३४L-२५६९, चालक विनोद डवरे रा. पांढरकवडा (लहान) आणि ट्रॅकटर क्रमांक MH-२९, BC १५९३ चालक संदीप जुनघरे रा. मांगली यांना महसूल विभागाने ताब्यात घेतले. परंतु ट्रॅक्टर मालकावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

चारही ट्रॅक्टर मालक मांगली गावतीलच असून राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे ट्रॅक्टर मालक सुरेश, तुकाराम, व जब्बार नामक वयक्तीचे असल्याची माहिती महसूल विभाग, गावकरी व इतर सर्वांना असल्यावरही त्यांच्यावर रेती चोरीचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही वरील लोकांचे लोकांचे ट्रॅक्टर रेतीची तस्करी करताना पकडण्यात आले होते व सदर नाला व पैनगंगा नदीच्या पात्रातून हेच लोक राजकीय दबाव टाकून दिवसरात्र रेतीची चोरी करत आहेत. रेती चोरटे राजकीय पदाचा दुरुपयोग करून तसेच गरज पडल्यास लोकप्रतिनिधीचे सहकार्य घेऊन लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करीत असल्याचे सर्वसामान्य बोलून दाखवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.