मार्की (बु) बेघर वस्ती 35 वर्षांपासून विकासापासून वंचित

आरोप प्रत्यारोपाने गाजली ग्रामसभा

0

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील पेसा अंतर्गत येत असलेल्या मार्की (बु) येथील बेघर वस्ती गेल्या 35 वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. वारंवार तक्रारी आणि निवेदन देऊनही विकासकामे झाले नाही. त्याअनुशंगाने १९ जूनला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यात घरकूल, बळीराजा चेतना अभियाचे पैसे वाटप, वस्तीतील रस्ते, व इतर विषयावर चर्चा झाली. मात्र सभेत सरपंच व उपसरपंचांकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने गावक-यांची निराशा झाली.

वॉर्ड क्रमांक ३ मध्ये एकही रस्ता नसल्याने अनेकदा आंदोलन करण्यात आले. या रस्त्याची मागणी केली असता आमदार फंडातून रोड घेऊन या असे उद्धट उत्तर देण्यात आले. इंदिरा आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना याची माहिती सरपंच यांना नव्हती. याबाबत त्यांना विचारणा करण्यात येताच उपसरपंच याचे ऊत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बळीराजा चेतना अंतर्गत निधीचा वाटप आपल्या नातेवाईक व ज्यांना २०-२५ एकर जमीन असलेल्या लोकांना वाटप करण्यात आल्याचाही तक्रार व आरोप ग्रामसभेत करण्यात आले.

ग्रामसभेत विकासकाम व इतर कामांबद्दल आझाद उदकवार ,पांडुरंग गजलवार, रमेश भट व शंकर तावडे यांनी ग्रामपंचायतीला चांगलेच धारेवर धरले. गेल्या 35 वर्षांपासून बेघर वस्तीत रोड तर सोडा एक साधी नालीसुद्धा नाही ज्यामुळे नागरिकांत ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी विषयी प्रचंड संताप आहे. येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नसून बहिष्कार टाकणार असल्याचे व याला जवाबदार शासन व प्रशासन राहणार असल्याचे आझाद उदकवार यांनी सांगितले.

निवडणूक येताच लोकप्रतिनिधी सह पुढारी खोटे आश्वासन देऊन आमची फसवणूक करून आमचा मतदानासाठी वापर करीत असल्याचे आरोप करण्यात आले. ग्रामपंचायतीने केलेला भ्रष्टाचार व विकासकामाबत तक्रार आझाद उदकवार यांच्या नेत्रत्वात करण्यात आले होते. परंतु “जियो और जिने दो्” च्या धोरणामुळे बेघर वस्तीतील एकही काम ३५ वर्षांपासून झाले नाही. तरी ग्रामपंचायत बाबत दिलेल्या तक्रारीची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशीही मागणी होत आहे. ग्रामसभेत सरपंच निकिता आत्राम, उपसरपंच सचिन पायघन, सचिव कोडापे मॅडम सह गावकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.