प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0 1,320

57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचा धनादेश

विवेक तोटेवार, वणी:  सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचा धनादेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गुरुवारी दिनांक 6 डिसेंबरला वणीतील शासकीय मैदानावर संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हंसराजजी अहिर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले हे होते.

केंद्र सरकारने ‘सर्वासाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू केली आहे. वणी नगर परिषदेच्या हद्दीतील 1397 दुर्बल घटक व अल्प उत्पन्न धारकांना (निम्न मध्यमवर्ग) याचा लाभ मिळणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचे धनादेश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांच्या हस्ते वितरण करण्यात आलेत. तर पुढील रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना कायम पट्टयांसाठी आवश्यक कागदपत्रेही अहिर यांच्या हस्ते देण्यात आले.

वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वणी नगर परिषद क्षेत्रात 1397 घरकुल केंद्र शासनाद्वारे मंजूर होऊन 5 कोटी पेक्षा अधिक निधी मिळाला आहे, अशी माहिती दिली.

नगरपालिकेद्वारा विकास कर माफ: तारेंद्र बोर्डे 

बांधकाम करते वेळी नगर पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी 5-6 हजारांचा विकास कर नगर पालिकेला द्यावा लागतो. मात्र या योजनेतील घरांसाठी हा कर नगरपालिकेतर्फे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थींना याचा मोठा लाभ होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.

या कार्यक्रमाला दिनकर पावडे, विजय पिदूरकर, विजय चोरडीया, रवी बेलूरकर, पंचायत समिती सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे, बंडू चांदेकर, संघदीप भगत, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी करून लाभार्थ्यांची माहिती दिली. तर राजू तोडसाम यांनी शुभेच्छा पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

mirchi
Comments
Loading...