रात्री चालला वेगळाच खेळ, तरुणीने मागितली ठाणेदारांनाच खंडणी

तरुणीविरोधात गुन्हा दाखल, ठाणेदारांची उचलबांगडी ?

0

विवेक तोटेवार, वणी: पेढे वाटल्यामुळे गुन्हा दाखल केल्याने वादग्रस्त ठरलेले वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे सध्या वेगळ्याच प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. वणीत रात्री वेगळाच खेळ चालला. एका तरुणीने खाडे यांना मध्यरात्री खंडणी मागितल्याने तसेच त्या तरुणीने मध्यस्थी करणा-या तरुणाला चावा घेतल्याने वेगळेच नाट्य रंगले. या प्रकरणी ठाणेदार बाळासाहेब खाडे व मध्यस्थी करणा-या व्यक्तीने सदर तरुणीवर तक्रार दाखल केली आहे. मात्र हे प्रकरण दिसते तसे सोप्पे नसून हे अवघड प्रकरण असल्याची चर्चा वणीत रंगत आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री 11 च्या दरम्यानची आहे. बाळासाहेब खाडे हे वणीतील बन्सल ले आउट परिसरात राहतात. रात्री 11 च्या दरम्यान वणीतील एक तरुणी त्यांच्या घरासमोर आली व तिने दरवाजा ठोकत शिविगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच 10 लाख रुपयांची मागणी करत नागपूरमध्ये फ्लॅट द्या अशी ही मागणी तिने केली. यावेळी खाडे आणि त्या तरुणीमध्ये जोरदार भांडण झाले. इतक्या रात्री सुरू झालेला गोंधळ पाहून तिथे काही लोक गोळा झाले.

या गोंधळामध्ये मनिष तुराणकर हा मध्यस्थी करण्यासाठी गेला. मात्र त्या तरुणावर सदर तरुणीने हल्ला करत त्याला जोरदार चावा घेतला. तसेच त्याने तिथून पळून गाडीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने त्या गाडीवर दगड भिरकावले. अखेर या विरोधात बाळासाहेब खाडे आणि मनिष तुराणकर यांनी तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. मनिष तुरानकर यांच्या तक्रारीवरून सदर तरुणीवर कलम 324, 342, 392, 427 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर तरुणीवर कलम 384, 392, 452, 542, 506, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाने वणीत एकच खळबळ उडाली आहे. ठाणेदारांच्या दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास वणीच्या एसडीपीओ ऐवजी पांढरकवड्याचे एसडीपीओ अमोल कोळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शनिवारी रात्री खाडे यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली.

सदर तरुणी याआधी नागपूर येथील एका पोलीस अधिका-याच्या प्रकरणात गुंतली होती.  पुढे आरोप प्रत्यारोप झाले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आता ही तरुणी एखाद्या ठाणेदार पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरी रात्री 11 वाजता का पोहोचली? तिथे जाऊन शिवीगाळ करत पैशाची मागणी का केली? मध्यस्थीची या प्रकरणाशी काय लिंक आहे? असे विविध प्रश्न वणीकर उपस्थित करत या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

तरुणीवर राजकीय नेत्यांचा व पत्रकारांचा दबाव ?
या प्रकरणात एका पक्षाचा नेता, एका पक्षाचा शहर अध्यक्ष, एक बिन पक्षाचा नेता व दोन पत्रकार या तरुणीवर दबाव आणत असल्याची माहिती वणी बहुगुणीला मिळाली आहे. राजकीय नेते व काही पत्रकार या प्रकरणात का स्वारस्य घेत आहे हे न उलगडलेलं कोडं आहे. या नेत्यांचे आणि पत्रकारांचे काय लागेबांधे आहेत या विषयी आता विविध तर्क लावले जात आहे.  यासोबतच संबंधीत तरुणी चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता, तिची तक्रार न घेता वणीच्या ठाणेदारांना याबाबत माहिती देण्यात आली. चंद्रपूर पोलिसांशी वणी पोलिसांचे काय कनेक्शन असे अनेक मुद्दे वणीकर उपस्थित करीत आहे.

ठाणेदार बाळासाहेब खाडे यांची उचलबांगडी ?
अलीकडे बाळासाहेब खाडे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पेढे वाटल्यामुळे नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरले होते. सध्या या प्रकरणामुळे पुन्हा बाळासाहेब खाडे चर्चेत आले आहे. या प्रकऱणामुळे त्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा सध्या वणीत रंगत आहे. तर त्यांच्या जागी मारेगावातील ठाणेदार दिलीप वडगावकर हे प्रभारी म्हणून रुजू झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता बाळासाहेब खाडे सध्या वैद्यकीय सुटीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र हे प्रकरण खाडे यांना चांगलेच अंगलट येणार असून त्यांची उचलबांगडी ठरली असल्याचे तर्क लावले जात आहे. सध्या या प्रकरणाची पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व दारव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तपासासाठी वणीत आल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.