ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावातील बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणा-या बालवाडी सध्या झुडुप आणि कच-याच्या साम्राज्यात सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. बालवाडीचा संपूर्ण परिसर झुडुपांनी वेढला आहे. त्यामुळे बालवाडीत शिकणा-या विद्यार्थ्यांना साप आणि विंचूचा धोका निर्माण झाला आहे.
बालकांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी बालविकास प्रकल्पाअंतर्गत 9 बालवाडी आहेत. या बालवाडीत शिकणा-या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बालवाडीत गरोदर महिलांना रोग प्रतिबंधक लसीकरण देखील केलं जाते. तसंच पोषण आहार वितरण देखील याच इमारतीमधून केलं जाते. मात्र या इमारती सध्या कच-याच्या विळख्यात आल्या आहेत. तसंच इथं असलेल्या झाडाझुडपांमुळे उंदरांचा उपद्रवही वाढला आहे.
(हे पण वाचा: अडेगाव रस्त्याची दुरवस्था)
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं झाडाझुडपांमुळे इथं सरपटणा-या प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. गरीब घरचे चिमुकले या बालवाडीत शिकतात. त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिका-यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पालक करीत आहे.