कलीम खान गझलेचं दुसरं नाव – बबन सराडकर

'शब्द'च्या 'गझल कौमुदी' प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : कलीम खान हे बहुभाषक आहेत. तसेच त्यांना अनेक भाषा येतात. त्यांचं लिखाणेखील विविध भाषांतून असतं आणि विविधांगी असतं. त्यांनी लिहिलेल्या गझला या थेट हृदयाला भिडणाऱ्या असतात. ते गझलेशी एकरूप होतात. त्यामुळे कलीम खान हे गझलेचं दुसरं नाव आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखक बबन सराडकर यांनी केलं. शब्द परिवाराद्वारा कॉलेज ऑफ बायोइंजिनिअरिंग अॅण्ड रीसर्च सेंटर येथे आयोजित आर्णी येथील कलीम खान यांच्या ‘गझल कौमुदी’ या संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग, पत्रकार दिलीप एडतकर, कवी मिर्झा रफी अहमद बेग, गझलरसिक नाना लोडम, सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना, कोबार्कचे संचालक विजय राऊत, प्रकाशक संजय सिंगलवार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना सराडकर म्हणाले की, अंतकरणाचा ‘निचोड’ म्हणजे कविता असते. जगातल्या कवितांचा ‘निचोड’ म्हणजे गझल. कलीम खान यांची शैली, आशय अभिव्यक्ती ही अत्यंत प्रवाही आहे. हा सोहळा काळजांचे सूर जोडणारा आहे. ते म्हणाले की, कविता, गझल किंवा कोणताही साहित्यप्रकार असो, त्याच्या केंद्रस्थानी माणूस असावा. कलीम खान यांच्या लिखाणात तो आपल्याला वारंवार भेटतो.

प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आमदार ख्वॉजा बेग यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केलं. कलीम खान यांची कविता ही संवादी आणि प्रवाही आहे असंही ते म्हणाले. माणसांनी आपापल्या सीमा आखल्या आहेत. ही सीमेची बंधन तुटायला हवी. माणसाने माणसाला जोडायला हवं, असंही ते यावेळी म्हणाले. कलीम खान हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे. ओघानेच पत्रकार दिलीप एडतकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साहित्य आणि संस्कृतीचा आढावा घेतला. कलीम खान यांचं मराठीवरील प्रेम, भिन्न संस्कृती आणि मिथकांचा अभ्यास हा थक्क करणारा आहे. त्यांच्या लेखनामुळे सर्व मराठीप्रेमींचा अभिमान वृद्धिंगत होतो.
सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी विविध सामाजिक अंगांवर भाष्य केलं. ते साहित्यातून कसं मांडलं जातं किंवा जावं यावर त्यांनी चर्चा केली. कलीम खान यांच्या गझलांतून येणाऱ्या सामाजिक जाणींवांवर त्यांनी भाष्य केलं. गझल रसिक नाना लोडम यांनीदेखील यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं.

शब्द परिवार आणि कॉलेजच्या नात्यांच्या आठवणींना कोबार्कचे संचालक विजय राऊत यांनी उजाळा दिला. शब्द परिवाराची देश-विदेशांत होणारी साहित्य संमेलनं ही यशस्वी नियोजनाचा आदर्श असतात. हजार शब्दांच्या वाचनांतून एखादं चित्र सहज उभं होतं. गझलकार यांनी कलीम खान यांनीदेखील गझल आणि त्यांच्या गझलसंग्रहावर आपले विचार मांडले. जे जे काही संवेदनशील मनाला बोचतं, त्यावर आपल्या प्रतिभेच्या द्रवाचा पापुद्रा गझलकार किंवा कलावंत चढवत असतो. त्या बोचणाऱ्या खड्याचाच कालांतराने मोती होतो. ही प्रक्रिया जितकी सहज होते, तितकीच गझलेची निर्मिती होते. विविध त्यागांतून साहित्यची निर्मिती होत असल्याचंही कलीम खान यांनी म्हटलं.

प्रकाशन समारंभानंतर ख्यातनाम गझलकार खलीश ऊर्फ अनंत नांदूरकर यांनी कलीम खान यांची प्रकट मुलाखत घेतली. सोबतच अजीज खान पठाण, मसूद पटेल आणि मान्यवर कवींचा मुशायरादेखील झाला. प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी केलं. संचालन ज्योती भगत यांनी केलं. तर आभार शब्दच्या उपाध्यक्ष शशी डंभारे यांनी मानले. अमरावतीसह मुंबई, वर्धा, यवतमाळ, आर्णी, उमरखेड, वणी, इंदोरसह विविध भागांतील साहित्यिक, कलावंत, रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत हा सोहळा झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.