200 युनिट मोफत विजेसाठी संजय देरकर यांचा एल्गार

वीजदर कमी करण्यासाठी 9 ऑगस्टपासून स्वाक्षरी अभियान

0

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर मैदानात उतरले आहेत. 9 ऑगस्टपासून त्यांचे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानाचा शुभारंभ 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजता टिळक चौक येथे होणार आहे. या अभियानाद्वारे 1 लाख 11 हजार स्वाक्षरी गोळा करून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे.

आपल्या परिसरात 5 हजार मेगावॅटची निर्मिती होते. यासाठी जमिन, कोळसा, पाणी हे परिसरातीलच वापरले जाते. मात्र परिसरातील लोकांनाच महाग दरात वीज खरेदी करावी लागते. सोबतच वीज निर्मितीमुळे परिसरात प्रदूषण पसरले आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आहे. इतकं सहण करूनही वीज नियमित मिळत नाही, लोडशेडिंगचा त्रास सहण करावा लागतो. शेतकरी विद्यार्थी, रुग्ण आणि छोट्या व्यावसायिकांना याचा फटका सहण करावा लागतो.

नुकतच दिल्ली सरकारने 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. दिल्ली सरकारला हे जमू शकते तर आपण तर स्वतः वीज निर्मिती करतो. मग आपल्याच भागात वीजेचे इतके महाग दर का आहेत असा सवाल संजय देरकर यांनी उपस्थित करत याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याची माहिती दिली.

या स्वाक्षरी अभियानाद्वारे सर्व शेतक-यांना संपूर्ण वीजमाफी देण्यात यावी, घरगुती वीज वापर धारकांना 200 युनिट वीज मोफत मिळावी, 200 युनिट वरील वीज प्रती युनिट 2.50 रुपये दरात देण्यात यावी, लघू व कुटीर उद्योगांना सवलतीच्या दरात वीज द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे. हे अभियान दिनांक 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रात चालणार असून 1 लाख 11 हजार साक्षरी गोळा केल्यानंतर हे सर्व निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले जाणार आहे. तरी या स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, नोकरदारवर्ग, महिला, मजुरदार वर्ग इत्यादींनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय देरकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.