आत्मपरीक्षणाचे स्थान असतो उत्सव – डॉ. स्वानंद पुंड
गोपाळकृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी प्रवचनमालेची सांगता
बहुगुणी डेस्क, अमरावती: उत्सवामध्ये सजावट, रांगोळ्या, आरत्या, अष्टके, मनोरंजन हे सर्व असायलाच हवे. पण या सर्वांच्या पार जात कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या चिंतनाच्याद्वारे आत्मपरीक्षण करणे आणि आत्मोन्नतीसाठी अधिकाधिक सिद्ध होणे, हाच उत्सवांचा मूळ उद्देश आहे” असे विचार विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले. अंबापेठमधील सुविख्यात गोपाळकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या कृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित प्रवचनमालेची सांगता करताना जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या “निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म” या अभंगावर ते बोलत होते.
व्यवहारात कुठल्याही गोष्टीची नव्हाळी चार दिवसात संपते. मात्र अध्यात्मात शेकडो वेळा तीच गोष्ट ऐकली तरी प्रत्येक वेळा नवा आनंद मिळतो हे वैशिष्ट्य अधोरेखित करीत आरंभ करून डॉ. पुंड यांनी जगद्गुरु तुकोबांनी सांगितलेल्या निष्ठा, भाव, निर्धार, निष्कामता, निश्चलता, विश्वास आणि अनन्यशरणता अशा या अभंगात सांगितलेल्या भक्तीच्या सात सूत्रांचे सोदाहरण, सविस्तर निरूपण केले. विनोदीशैली खुसखुशीत उदाहरणे याद्वारे मनोरंजन करीत अंतर्मुख करणाऱ्या चिंतनाने युक्त अशा या निरूपणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण कारंजकर यांनी केले.