‘जीवलहरी’ आणि विजय यशवंत विल्हेकर
'फकिरीचे वैभव' हे बहुचर्चित पुस्तक वाचकांच्या सेवेत उपलब्ध
सतीश देशमुख, पणज-दर्यापूर: कोरोनाकाळामुळे ६,७ महिन्यांपासून विजुभाऊंची भेट नव्हती. अमरावतीला जाता-येता थोडाकाळ विजुभाऊकडे बैठक होतेच. चळवळीतला कुणीही कार्यकर्ता दर्यापूरवरुन गेला, म्हणजे विजुभाऊंची भेट घेतल्याशिवाय पुढे सरकतच नाही.
विजुभाऊ याला जीवलहरी संबोधतात. जिवलहरी हा शब्द प्रथमत: ऐकला तो विजुभाऊंच्याच तोंडून. पुढे मागे ‘जीवलहरी’चे पेटंट त्यांनाच मिळायला पाहिजे.
जवळपास ७० दशकात पोरगा डॉक्टर व्हावा म्हणून यशवंत बापाने पोटाला चिमटा घेऊन पोराला शिकण्याकरिता अमरावतीला पाठविले. पण नियतीने तेथे जीवलहरीचा गोतावळा हजर ठेवला. मग काय, शिक्षण तर आल्या जन्मात कधीही घेता येईल, तेंव्हा संपूर्ण क्रांतीकरिता सरसावलेल्या जे.पीं.च्या चळवळीत
स्वत:ला झोकून दिले.
जवानी उसी को कहते है
जो प्रलय देखकर मुस्कराये,
जवानी उसी को कहते है
जो संकटमे औरों के काम आये ||
इथं तर देशच संकटात सापडला होता. चळवळ्या स्वभावाच्या विजुभाऊला तटस्थ राहणे शक्य नव्हते. चंद्रकांत वानखडे, कमल करवा, गजानन अमदाबादकर, प्रकाश बोनगिरे, देवेंद्र आंबेकर, सुधाकर जाधव हे जिवाभावाचे सहकारी. त्या काळात विचारांच्या नि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत गेल्यात.
मिथ्या हा संसार
सर्व व्यवहार
वाया येरझार
हरीविन ||
डॉक्टरकीचे स्वप्न मायबापाच्या उरात कोंबून विजुभाऊंनी स्वत:ला चळवळीत झोकुन दिले. रामराज्याचे स्वप्न नि महात्मा गांधीचा आदर्शवाद दाखविणारे जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले. त्यांनी आधीच्याच सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. किंबहुना त्यांच्याहीपेक्षा काकणभर पुढेच. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ऊस जाळला. शेतकऱ्यांच्या समस्या संपायचं नावच घेत नव्हत्या. समग्रक्रांतीचे स्वप्न भंगले.
शहरी कार्यकर्त्यांच्या तोंडात रसगुल्ला, तर ग्रामीण मंडळी तोंड विचकून बसली होती. कोठे जायला निघालो आणि कोठे येऊन पोहचलो, अशी अवस्था. तशातच जयप्रकाश नारायण यांनी अखेरचा श्वास घेतला. जनता पार्टीची वाताहत त्यांच्या समोरच झाली. नंतर नामांतराच्या चळवळीतही विजुभाऊतला कार्यकर्ता अग्रणीच .
सन 1974 साली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्विझर्लंडमधुन शरद जोशी भारतात परतलेत, पीक कोणतही घ्या, त्याला कर्जाचे फळ येते. हे लक्षात येताच त्यांनी व्यवस्थेविरुध्द एल्गार पुकारला. त्यांची विदर्भातील पहिली सभा दर्यापूरलाच झाली. सर्व गटांतटांतील लोकांनी पक्षाभिनिवेश बाजुला सारुन कार्यक्रम केला. शरद जोशींच्या साध्या सोप्या अर्थवादी मांडणीने मनातले ब्राह्मणद्वेषाचे मळभ कुठल्या कोठे निघून गेले .
संघर्षवाहिनीतील या कार्यकर्त्याने शेतकरी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. कुठलंही काम हात राखून करायचं नाही, झोकून देऊनच करायचं हा खाक्या. घरदार संसार हे सारं मिथ्या आहे. या संतवचनाला जागून कार्य सुरु. विजुभाऊंचा कामाचा आवाका जसा मोठा, तसाच त्यांचा मित्र परीवारही मोठा.
कोण कुठल्यावेळी कोणतं काम घेऊन येईल, याचा नेम नाही. ती सर्व कामे मार्गी लावणे हे विजुभाऊंचे आद्य कर्तव्य. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अधिकारी, पदाधिकारी, गावगाड्यातील कार्यकर्ते, सर्व जाती-धर्मांतील लोकांकरिता यशवंतभुवनचे दरवाजे सताड ऊघडे.
सबके लिए खुला है मंदीर ये हमारा |
म्हणूनच इतरांकडे तीन पायऱ्या न चढणाऱ्या शरद जोशींची यशवंतभवनच्या 14 पायऱ्या चढताना कुठलीही तक्रार नसे. विजुभाऊसुध्दा ”चला सर, थोडं गिर्यारोहण करु म्हणायचे” आणि शरद जोशी त्यांना हसून व पहिला मजला चढून दाद द्यायचेत. शेतकरी चळवळीला अनेक चढऊतार आलेत. त्याही अवस्थेत अमरावती जिल्ह्यातील संघटनेचं कार्य चेतना निर्माण करी.
मी मी करणाऱ्या अनेकांनी संघटनेला रामराम ठोकला. काहिंनी कधी तळ्यात कधी मळ्यात भूमिका बजावली, पण विजुभाऊंच्या छातीवरचा रक्तवर्णी बिल्ला अढळ राहिला. रक्ताचं पाणी करुन चळवळीत जान ठेवणाऱ्या विजुभाऊंचा 2007 च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवच काय, मतदारांच्या गावीही हा कार्यकर्ता नव्हता.
तरीही विजुभाऊ थांबले नाहीत. त्यांनी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकरिता काम करीतच राहीलेत. ‘आम्ही सारे” या संस्थेने शेतकरी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देत असलेला 1 लाखाचा पुरस्कार विजुभाऊंना दिला,
त्यांनी तो तेथेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी देऊन टाकला. अर्थवादी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वत:च्या परिवाराची आर्थिक घडी नीट बसवता आली नाही, ही प्रतिक्रिया ‘आम्ही सारे’च्या प्रमोद लाजुरकरांची होती.
आगीत उडी घेतो म्हणणे वेगळे, प्रत्यक्ष घ्यायला जिगर लागते.
विजुभाऊंनी स्वत:आयुष्यातील बऱ्या-वाईट घटनांकडे त्रयस्थाच्या नजरेने पाहिले. दुसऱ्याच्या सुख-दु:खात मात्र कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. सिंधू वहिनींनी हा संन्याश्याचा गाडा विनातक्रार ओढला. आल्या गेल्याच्या स्वागतास त्या सदा सज्ज. विजय यशवंत विल्हेकर यांच्या आयुष्यातील घटनांचा धांडोळा असलेले “फकीरीचे वैभव”, कार्यकर्त्यांना अनामिक समाधान देईल.
विजुभाऊंच्या ‘फकिरीचे वैभव’
ले देके अपने पास फकत नजरही तो है
क्यौं देखे जिंदगी को औरो की नजर से हम,
माना की ईस जमीं को न गुलजार कर सके
कुछ खार तो कम कर ही गये गुजरे जिधर से हम ||
मनोविकास ह्या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेने विजुभाऊंचं ‘फकिरीचे वैभव’ पुस्तक प्रकाशित केलं. त्याचे वितरक प्रदीप पाटील आहेत. पुस्तक मागवण्यासाठी 98608 31776 या नंबरवर कॉल करा. किंवा बुक्सकट्टा, ३२, राजश्री कॉलनी, दस्तुरनगर अमरावती, महाराष्ट्र या पत्त्यावरून डायरेक्ट पुस्तक मिळवू शकता.
केवळ शेतकरी चळवळच नव्हे, तर सर्वच चळवळीतील कार्यकर्त्याला उपयोगी असे हे पुस्तक आहे. किंबहुना प्रत्येक जगणाऱ्या माणसाला संकटांशी लढताना ‘फकिरीचे वैभव’ ही गुरुकिल्लीच ठरेल. एक दर्जेदार नि संग्रहणीय ग्रंथ म्हणून आजच मागवा. जवळच्यांना विविध प्रसंगांनिमित्त किंवा सहजच भेट म्हणून हे पुस्तक द्या.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)