रेती चोरीतील आरोपींचे काय!

पोलीस व महसूल विभागात अडकला तक्रारीचा खेळ

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार आणि पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेतीसाठा गावकऱ्यासमोर जप्त केला. पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार यांना तो सुपूर्तनाम्यावर दिला. तहसीलदार यांच्या पत्राच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी काही कर्मचारी रेती आणण्याकरिता पाठविले. तेथील चार ब्रास रेती रातोरात गायब झाली. पोलीस आणि महसूल विभागात हा तक्रारीचा खेळ अडकला आहे.

गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी पत्राद्वारे तहसीलदार यांना सदर ठिकाणी रेती नसल्याचे कळविले. ७ ब्रास रेती सुपूर्तनाम्यावर दिल्यानंतर गावातीलच सरपंचाचे पती संकसनवार व मुरली वैद्य या दोघांनी न विचारता अवैध रेतीसाठा सिमेंट रोडच्या कामात वापरल्याचा आरोप करीत तशी तक्रार पाटण पोलीस स्टेशनला दिली व कार्यवाहीची मागणी केली आहे.

शासनाचे नियम डावलून गावातीलच लोकांनी सिमेंट रोडच्या कामात जप्त केलेल्या रेतीचा वापर केला. रेतीसाठा पोलीस पाटील यांच्या सुपूर्तनाम्यावर दिल्यानंतरही रेतीची विल्हेवाट कशी लावली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पोलीस पाटील यांनी पाटण पोलीस स्टेशनला ११ जुलै रोजी तक्रार दिली पोलिसांनी सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान तक्रारकर्त्यासह अनेकजण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

पोलिसांचा संपूर्ण तपास होऊनही सदर रेती चोरट्यांवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही. याबाबत ठाणेदार अमोल बारापात्रे यांना विचारणा केली असता तक्रारकर्ता हा संशयाच्या भाेवऱ्यात असल्यामुळे आम्ही त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करीत नसून पटवारी, मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांनी येऊन तक्रार दिल्यास आम्ही गुन्हे दाखल करतो. या बाबत दोन पत्रंसुद्धा तहसीलदार यांना पाठविल्याचे सांगितले.

ठाणेदार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रावरून सिद्धीकी नामक पटवारी यांना तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. परंतु त्या तक्रारीत घटनेची तारीख, वेळ, चोरीचा उल्लेख नसल्याने पटवारी सिद्धीकी यांना पत्र देऊन ठाणेदार यांनी परत पाठविले. रीतसर तक्रार देण्यास सांगितले. दोन्ही विभागाच्या खेळीवरून जनतेत विविध चर्चा होऊन मोठ्या शंकेला पेव फुटले आहे. तरी सदर प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.