जितेंद्र कोठारी, वणी: नवरात्रीच्या 9-10 दिवसांत जैताईसह अन्य मंदिरात फूल, पूजासाहित्य विकणारे बसतात- दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या भरवशावर त्यांची या दिवसांतील जगण्याच्या वेदनेची तीव्रता कमी होते. यंदा कोरोनामुळे मंदिरात उत्सव होणार नाहीत.
दर्शनाला लोक येणार नाहीत. रस्त्यांवर हार-फुलांची दुकाने लागणार नाहीत. कोरोनापुढे विश्व हारले. तरीही हार-फुलं विकणारे ‘हार’ मानणार नाहीत. एक आशा त्यांच्यात जिवंत आहे. तरीदेखील त्यांच्यासह सर्वच छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना याचा फटका बसला आहे.
सध्या शासनाने प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे प्रार्थनास्थळांबाहेर व परिसरात हार, फूल, प्रसाद व पूजेचे साहित्य विकून उदरनिर्वाह करणाऱ्या लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पूजा साहित्य व फूल विक्रेत्यांना यावर्षी नवरात्रोत्सवात मंदिरेउघडण्याची अपेक्षा होती.
मात्र शासनाच्या निर्णयामुळे त्यांची निराशा केली आहे. देऊळ बंद असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या फूल-हार व पूजा साहित्य विक्रेत्यांना नवरात्रोत्सव मंदिरे उघडण्याची अपेक्षा होती. त्यासाठी अनेक दुकानदारांनी पूजा साहित्य खरेदी केले होते.
नवरात्र उत्सवादरम्यान वणी येथील प्रख्यात जैताई माता मंदिरात दरवर्षी भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरात फूल, हार, प्रसाद, नारळ, ओटी भरण्याचे साहित्य, खेळणे आदींच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल या 9-10 दिवसांत होते. मात्र यंदा जैताई मंदिर न उघडल्यामुळे या छोट्या व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
एकीकडे बाजारपेठा, दारूची दुकाने, बार, हॉटेल्स सुरु करण्यात आली आहेत. मात्र केवळ मंदिरं उघडण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. शासनाला या निर्णयातून नेमकं काय सिद्ध करायचे आहे हे कळत नसल्याची प्रतिक्रिया भाविकांकडून ऐकायला मिळत आहे.
जुन्या लोकांना येते इंगोले गुरुजींची आठवण
अनेक वर्षांपासून नवरात्रीत जैताई मंदिरात केवळ दोनच दुकाने लागायची. सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र इंगोले आणि बुजवणे यांची दोनच दुकाने इथे असायची. इंगोले गुरुजी धार्मिक आणि सामाजिक सेवा यातून करायचे. त्यांचा जनसंपर्कही मोठा होता.
येणाऱ्या-जाणाऱ्यांना या दुकानात इंगोले गुरुजींची सहज भेट घेता यायची. गुरुजी आपल्यात नाहीत. त्यामुळे जुन्या लोकांना या परिसरात गेल्यावर आजही नवरात्रीत गुरुजींची आठवण येते. यंदा मात्र काही म्हणजे काहीच नाही.
इथे लागणारी ही दोन जुनी दुकाने म्हणचे जणू जनसंपर्क कार्यालयंच होती. उभ्या उभ्या अनेक सुख-दु:खांवर चर्चा व्हायची. अनेक बाबींवर संवाद व्हायचा. सुसंवाद व्हायचा. परिसरात गैरवर्तन करणाऱ्यांवर गुरुजींची नजर असायची. मास्तरकीची शिस्त मंदिराच्या परिसरातदेखील पाहायला मिळायची.
बाळ सरपटवार, सचिव जैताई देवस्तान, वणी
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)