एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!

अनुदानित हरभरा बियाण्यांपासून शेतकरी वंचित

0

तालुका प्रतिनिधी, वणी: पेरणीचा हंगाम सुरू झाला. तरी कृषी विभागाने अनुदानित हरभरा बियाण्यांचे वाटप केले नाही. एकाच लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत आहे. यामुळे एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला मिळाली सापशिडी असे म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकरी अनुदानित बियाण्यांपासून वंचित आहेत. म्हणून शासनाने अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांनी मागणी आहे.

शेतकरी रब्बी हंगामाच्या पूर्व तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी शेताची नांगरणी, वखरणी करण्याच काम सुरू आहे. यावर्षी परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे. रब्बी हंगामात कोरडवाहू आणि ओलिताखालील शेतात हराभरा बियाण्यांची पेरणी केली जाते.

वणी तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून परतीचा पाऊस सतत पडत आहे. पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीत हरभरा पिकांची लागवड  करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. रब्बी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू, भुईमूग आदी पिकांची पेरणी करतात. परंतु जास्तीत जास्त शेतकरी हरभरा पीक घेतात.

कृषी केंद्रात विविध कंपनीची हरभरा बियाणे विक्रीला उपलब्ध आहे. मात्र प्रति किलो 70 ते 90 रुपये दराने खरेदी करावे लागते. महागडे बियाणे खरेदी करणे बहुतांश शेतकऱ्यांना शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्रातून शेतकरी अनुदानित हरभरा बियाण्यांची खरेदी करीत आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानित बियाण्यांपासून वंचित आहेत.

दोन्ही जिल्हे एकाच लोकसभा मतदारसंघात येत आहेत. तरी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानित बियाणे उपलब्ध करून का देण्यात आली नाही. ? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. संबंधित विभागाने त्वरित अनुदानावरील हरभरा बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी परमडोहचे उपसरपंच संदीप थेरे यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.