मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर

माझे लंग्स ९० टक्के डॅमेज झाले होते. मला माझं भविष्य दिसत होतं. मी माझी पत्नी साक्षीला हात जोडून माफी मागितली. तिला निरोप घेतो असं म्हटलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मला हैदराबाद किंवा चेन्नईला न्यायचा परिवाराने विचार केला. एअर लिफ्टची तयारी झाली. आदल्या दिवशी सर्वांशी बोललो. सकाळी ११ वाजता मला एअर लिफ्ट करणार होते. परंतु त्याआधीच माझी अवस्था खालावली. डॉक्टरांच्या टीमने देखील माझी जिवंत राहण्याची आशा सोडली. ते घरच्यांना बोलावून घ्या बोलले. हे सगळे मी कानाने ऐकत होतो...

मृत्युच्या दारातून परतताना…

सुरवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे. मला आठवते एप्रिल (2021) महिन्याच्या ६ तारखेला अंग दुखायला लागलं. खोकला आणि नंतर ताप नंतर जेवणात चव आणि सुगंधाची जाणीव नाहीशी झाली. तेव्हा मी फारसे सिरीयसली न घेता घरगुती उपचार सुरू केलेत. एक-दोन दिवसात बरं वाटायला लागलं. ताप यायचा नी जायचा. त्यात ८ एप्रिल २०२१ ला मी कोविड टेस्ट केली. ९ एप्रिलला जो रिझल्ट आला तो धक्कादायक होता. मी पॉझिटिव्ह निघालो होतो.

रिपोर्ट मिळाल्यानंतर मी स्थानिक डॉक्टरांना भेटायला गेलो. पण डॉक्टरने उपचाराकरीता चक्क नकार दिला. शेवटी त्यांनी माझ्या बायकोला मेडीसिन प्रिस्क्रीप्शन देऊन उपचार सुरू करायला सांगितले. १० एप्रिलपासून औषधोपचार सुरू झाले. पण त्याला बॉडी रिस्पॉन्स देत नव्हती. अनेक प्रयोग करून पाहिलेत. सीटी स्कॅन सुद्धा जास्त आला. उपचाराचा काहीच उपयोग होत नव्हता. दरम्यान माझा साळा मला घरी भेटायला आल्यामुळे तो सुद्धा पॉझिटिव्ह आला होता. 

राहूलनी मला छावणी, नागपूर येथील डॉ. अशर यांच्याकडे नेलं. तिथं माझ्यावर नव्याने औषधोपचार सुरू झाले. डॉक्टरांनी मला दुसऱ्या दिवशी सुद्धा औषधोपचारासाठी बोलावलं. पण त्या दिवशी सकाळी माझं सॅच्युरेशन हे हळूहळू ९० ते ८८ पर्यंत कमी झालं होतं. डॉक्टरांनी लगेच मला बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला सांगितलं. कारण त्यांच्याकडे पण बेड्स आणि ऑक्सिजन सिलिंडरचा साठा फक्त २ तासांचा उपलब्ध होता.

त्यावेळेस नेमकं नागपूर सकट संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन लागलं होतं. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नव्हते. ऑक्सिजन सिलिंडरची खूप कमतरता होती. परिस्थिती खूप कठीण झाली होती. तेव्हा माझ्या साळ्याचा व्यावसायिक मित्र विजय बजाज यांच्या ओळखीने मला एक बेड मिळाला. वर्धमान नगर, नागपूर येथील रेडियन्स हॉस्पिटलमधे डॉ. मनोज पूरोहित यांनी माझ्यावर उपचार सुरू केले. १६ एप्रिलला मी त्यांच्याकडे भरती झालो होतो. दोन दिवस तसा बराच होतो. नियमित व्यवहार करायचो. मात्र तिसऱ्या दिवशी वॉशरूममध्ये नेमक चक्कर येऊन पडलो. तेव्हा मला लगेच ऑक्सिजनचा सपोर्ट देण्यात आला आणि लगेच आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं.

माझी ऑक्सिजनची लेवल कमी-जास्त होत होती. माझी प्रकृती हळू हळू ढासळत होती. आजूबाजूची परिस्थिती देखील प्रचंड भयंकर होती. हॉस्पिटलमध्ये रोज ७ ते ८ लोकांचा मृत्यू व्हायचा. माझ्या समोरच्या एका रूममध्ये त्या मृत शरीराच्या ढीग असायचा. त्यात तरूण, वृद्ध सगळेच होते. अनेकांचे मृत शरीर डोळ्यांसमोर दिसायचे. त्यात एक डॉक्टर मॅडम “ये नंबर के बेड की बॉडी निकालो, वो नंबर के बेड की बॉडी निकालो”, असं रोजच्या रोज येऊन ओरडायची. कदाचित तिला यासाठीच अपॉईंट केलं असेलं. त्यात ऑक्सिजन सिलिंडरचा शॉर्टेज होताच. लोक आणि रूग्णही वैतागले होते. काही रूग्ण तर ऑक्सिजनचा मास काढून फेकत होते, ओरडत होते.

दरम्यान मी हॉस्पिटलचे जेवण बंद केलेत. आणि माझी पत्नी साक्षी सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी फ्रुट्स वगैरे आणि रात्रीचे जेवण असं रोजच चालू होत. तिकडचे वॉर्ड बॉय मला रोज चारून द्यायचे. कोविड आयसीयूमध्ये असल्यामुळे घरच्यांना आतमधे यायची परवानगी नव्हती, तरीसुद्धा माझ्या परिवारामध्ये माझी पत्नी साक्षी, साळा राहूल, माझा लहान जावई स्वप्नील, माझी साळी ममता, माझी लहान बहीण प्रिती आणि माझ्या पत्नीचे काका जयराम या सगळ्यांनी हॉस्पिटलच्या Staff, Bouncers या सगळ्यांची ओळखी करून घेतली होती.

कोविड होण्याआधीचा फोटो

मला आठवतं त्यावेळेस रेडीयन्स हॉसपिटलमध्ये काही पॉलिटिकल प्रेशर आलं होतं, तिकडचे वॉर्ड बॉय रात्रीच्या वेळेला एकमेकांशी डिस्कस करायचे म्हणूनच हॉस्पिटलने गार्ड्स म्हणून बाऊंसर ठेवले होते. काही बाऊंसर चांगले होते. त्यातला एक बाऊंसर सागर हा रोजची माझी दिनचर्या माझ्या पत्नीला फोन करून सांगायचा. रोज सकाळची माझी फोटो, माझ ऑक्सिजनच सच्युरेशन हे सगळ तिला व्हॉट्सअप करायचा. मी जेवलो की नाही हे सगळं तिला सांगायचा.

मला नीट बोलताही येत नव्हतं तरी त्याला इशाऱ्याने जेव्हा मी बाहेर येईल मला तुझ्यासारखी बॉडी बनवणारं असा इशारा करून बोलायचो. त्यावेळेस फक्त इशाऱ्यानीच सगळ्या गोष्टी मी करायचो. दवाखान्यातल्या विविध मशिनरीजचा आवाज मला असह्य होत होता. त्यातच एक दिलासा देणारी गोष्ट होती ती म्हणजे माझा परिवार मला रोज दिसायचा. कारण इतर पेशंटचे परिवार मला खूप कमी दिसत होते, कदाचित कोविड होईल या उद्देशाने की बाकी सेक्युरिटीमुळे पण होऊ शकते.

माझा परिवार रोज डॉक्टरांना माझ्या रिपोट्स बद्दल विचारपूस करायचे. रोजच्या रोज औषधोपचार होत होते. ब्लड टेस्ट आणि विविध टेस्ट होत्या. माझ्या आईने माझी आवडती आलू गोबीची भाजी मला खायला पाठवली. ते कदाचित माझं त्यावेळेस शेवटचं जेवण. कदाचित देवाला वाटलं असावं की, आईच्या हाताच शेवटचं तू खाऊन घे. नंतर तू राहणार की नाही. त्या नंतर माझं जेवण करणं बंद झालं. नंतर मला सलाईनद्वारे लिक्विड जेवण देऊ लागले.

अर्धेअधिक कुटुंब निघाले पॉजिटिव्ह
खूप महागडा असा औषधोपचार सुरू होता. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत होती. एक महत्वाचे म्हणजे त्यावेळेस माझी मोठी बहीण, मोठे जावई ते सुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह झालेत. जावई होम क्वांरटाइन तर मोठी ताई मेडिकलला ऍडमिट होती. तेव्हा ती सुद्धा खूप सिरीअस झाली. माझा लहान जावई मेडिकल फिल्डमध्ये असल्याने त्याच्या ओळखीने तिला ऑरिअस हॉस्पिटल मधे डॉ. आशिष गांजरे यांच्याकडे ऍडमिट केलेत.

माझी आई, माझी चार वर्षाची भाची आणि हे दोघेही घरी एकटे राहत होते. रोज माझी भाची, ‘माझी आई बाबा कुठे आहे. मला तिच्याकडे जायचे आहे,’ असं रोज बोलायची त्यावेळेस माझी आई ‘तू देवाजवळ प्रार्थना कर की आई, बाबा आणि मामा यांना लवकर घरी पाठव.’ अशी रोज ती प्रार्थना करायची. त्यावेळेस माझ्या आईची काय परिस्थिती असेल की तिचे दोन्ही लेकरू जीवन-मरणाची परीक्षा देत आहेत. आता याचा कधी कधी विचार येतो. मला कोव्हिड आधी झाला होता. मी ऍडमिट असताना सिरीअस होतो तेव्हा घरी ताई रोज माझ्यासाठी प्रार्थना करायची. नंतर तीसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह झाली. नंतर ती सुद्धा सिरीअस झाली.

पण तिने लवकर ट्रीटमेंट चालू केली आणि ती सिरीअस झोनमधून बाहेर पडली आणि हळूहळू ताई आणि जावई रिकव्हर झालेत. त्यावेळेस माझ्या परिवाराने आमच्या दोघांची परिस्थिती एकमेकांना सांगितली नव्हती. ताईला माझं माहिती नव्हतं आणि मला तिचं. पण जेव्हा १-२ लोकांचा तिला माझ्याबद्दल फोन गेला असेल तेव्हा कदाचित तिला कळल असेल.

सासरच्या लोकांनी तज्ज्ञ डॉक्टरांना माझे रिपोर्टस् दाखवलेत. डॉ. समीर अरबट, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. आशिष गांजरे यांनी ते रिपोर्ट पाहिलेत. डॉ. समीर अरबट यांनी हैदराबाद येथील KIMS (Krishna Institute of Medical Science) किंवा चेन्नई येथील MGM (Mahatma Gandhi Medical College & Research Institute) या दोन हॉस्पिटल सुचवलं. दरम्यान माझे लंग्स ९० टक्के डॅमेज झाले होते. मला हैदराबाद किंवा चेन्नईला न्यायचा परिवाराने विचार केला.

अखेर मला हैदराबाद येथील KIMS हॉस्पिटलला न्यायचं परिवाराने ठरवलं. नंतर माझे रिपोर्टस् त्यांना पाठवण्यात आले. KIMS च्या डॉक्टरांनी माझ लंग्ज ट्रान्सप्लांट करावे लागतील अस बोलून माझी तिकडे ऍडमिशन झाली. माझ्या परिवारानेसुद्धा त्यासाठी दुजोरा दिला आणि KIMS ला जायच ठरलं.

नंतर २८ एप्रिल २०२१ ला KIMS ची लोकल टीम हॉस्पिटलला आली. २९ एप्रिलला एअर लिफ्टची तयारी झाली. व्हीलचेअरने मला ऑक्सिजन सपोर्टने मला न्यायचं ठरलं. मी होकार दर्शविला. परिवारातील सदस्य मला धीर देत होते. त्या रात्री म्हणजे आदल्या दिवशी मी माझ्या मित्रांशी, माझे विलास सर ज्यांना मी माझा मोठा भाऊ समजतो. या सगळ्यांशी माझ्या पत्नीने व्हिडीओ कॉलवर बोलण करून दिलं. सगळ्यांनी मला धीर दिला. त्यावेळेस माझ्यासाठी माझा संपूर्ण परिवार, मित्र परिवार, गुरुबंधू परिवार, माझे सर, मॅडम, संपूर्ण ऑफिसचा स्टॉप हे सगळेच माझ्यासाठी प्रार्थना करीत होते.

माझा मित्र नितीन त्याची बायको ग्रेसी भाभी ही ऑडिओ कॉलने स्पीकरवर माझ्यासाठी प्रार्थना करीत होती. सगळ्यांच्या प्रार्थना देवापर्यंत जात होत्या. माझा साळा राहुल हा माझ्यासाठी खूप धडपडत होता. त्यात तो देखील कोव्हिड पॉझिटिव्ह होता. तरी देखील तो अहोरात्र माझ्या सेवेत होता. माझ्या पत्नीला कदाचित कोव्हिडची भीती नव्हती. ती जवळ येऊन माझा लाड करायची. मी तिला तू दूर राहा.. जवळ येऊ नको असं बोलायचो पण ती जवळ येऊन मला धीर द्यायची. माझं जेवण बंदच होत. नळीतून लिक्विड डायट सुरू होता. मला चालता फिरता येत नव्हतं. त्यामुळे मलमूत्र विधी सगळं बेडवरच व्हायचं. त्याची मला देखील स्वत:ला खूप किळस येत होती.

२९ एप्रिलला सकाळी सकाळीच डॉक्टर आलेत. मला ३० लीटरचा ऑक्सिजन सपोर्ट सुरू होताच. त्यात मला निमोथेरिक्ससुद्धा झालं होतं. मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होताच. तरीदेखील मी आशा सोडली नाही. मी साईबाबांचा भक्त आहे. साईबाबांना मी प्रार्थना करायचो. त्यांचा जप करायचो. मला माझं भविष्य दिसत होतं. मी माझी पत्नी साक्षीला हात जोडून माफी मागितली. तिला निरोप घेतो असं म्हटलं. साक्षीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने भावाला विनंती केली. परिवारासोबत सविस्तर चर्चा केली आणि मला KIMS, हैदराबादला उपचाराकरिता नेण्याची तयारी झाली.

एअरलिफ्ट करण्याआधी पुन्हा प्रकृती खालावली
एकमो मशिनवर मला शिफ्ट करायचं परिवारानं ठरवलं. नागपूरचे रेडियन्स हॉस्पिटलचे डॉ. मनोज पुरोहित यांनी एक युनिट तयार केलं. हैदराबादवरून एक डॉक्टर आणि KIMS ने अपाइंट केलेली लोकल टीम २९ एप्रिलला सकाळी ११ वाजता मला एअर लिफ्ट करणार होते. परंतु माझी अवस्था खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने देखील माझी जिवंत राहण्याची आशा सोडली होती. माझ्या घरच्यांना बोलावून घ्या म्हणून बोलले. हे सगळे मी कानातून ऐकत होतो.

माझं सॅच्युरेशन ७० ते ७५ एवढ कमी झालं होतं. माझ्या छातीत दुखायला लागलं. माझा साळा राहुलने डॉ. मनोज पुरोहित यांना फोन केला. शेवटचं सॅच्युरेशन २८ पर्यंत गेला होता. राहुलने फक्त २ सेकंदाकरिता माझ्याकडे बघितलं. मी त्याला हाताने इशारा करत मला छातीच्या बाजूला दुखत आहे. त्याने लगेच डॉ. मनोज पुरोहित सरांना कळवलं. डॉ. मनोज पुरोहित यांनी राहुलला म्हटलं, ‘तेरे जिजाजी को सिर्फ मे हात लगाऊंगा, बाकी किसी को हात नही लगाने दूंगा, तू चिंता मत कर. ९९ सॅच्युरेशन मे उनको एअरलिफ्ट करवाऊंगा.‘ असं बोलत राहुलनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्यावर उपचार सुरू केलेत.

डॉ. मनोज पुरोहित यांनी लगेच एक्स-रे काढला. माझ्या छातीच्या बाजूला ICD (Implantable Cardioverter Defibrilates) केला. माझ्या छातीच्या बाजूने फ्लूईड आाणि हवा निघाली. मला व्हेंटिलेटरचा सपोर्ट घेऊन इंट्यूबेशन केल. गळ्यात सेंटर लाईन टाकली. ती पहिल्या प्रयत्नात फेल झाली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं. हैदराबादला सकाळी ११ वाजता निघणार होतो. मात्र ते शक्य झालं नाही. शेवटी सायंकाळी ४ वाजता माझ एअरलिफ्ट झालं. सौ. साक्षी आणि तिचे काका जयराम सकाळीच बाय रोड हैदराबादला रवाना झाले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते हैदराबादला पोहोचले.

व्हीलचेअरऐवजी मला स्ट्रेचरने नेण्यात आलं. एकमो मशिनसोबत होतीच. पण सुदैवाने त्या मशिनची गरज पडली नाही. असं म्हणतात की, एअरलीफ्टच्या वेळेस पेशंट १०० मधून ५ असा रेशो असतो. मेडिकल लॅग्वेजमध्ये पेशंट colapsed होतो म्हणजे मरतो असं बोलतात. पण मी ५ मध्ये होतो. म्हणजे मी जिवंत होतो. हैदराबाद येथील KIMS या वैद्यकीय संस्थेच्या अतिदक्षता विभागात मला दाखल केलं. दोन दिवस मी शुद्धीवरच नव्हतो. माझ्यावर उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टर राकेश यांनी सुरवातीला माझ्यावर ट्रीटमेंट केली. माझं इंट्युबेशन काढलं. मी शुद्धीवर आलो. तेव्हा डोळ्यासमोर माझी पत्नी साक्षी, तिचे काका आणि माझा साळा राहुल दिसला.

राहुलची तब्येत ठीक नसतानाही तो बाय रोड हैदराबादला पोहोचला होता. माझ्यावर उपचार सुरू होते. माझी बॉडी हळू हळू रिस्पॉन्स देत होती. माझा पूर्ण परिवार थोडा समाधानी झाला. मात्र त्याच रात्री मी पुन्हा सिरीयस झालो. सुदैवाने परत इंट्युबेशन करायच काम पडलं नाही. १ मे २०२१ ला कोव्हिड निगेटिव्ह झालो. NRBM आणि BIPAP च्या सपोर्टने मला २ मे २०२१ ला HLT-ICU मध्ये शिप्ट करण्यात आलं. औषधोपचार सुरूच होते.

हैदराबाद KIMS हॉस्पिटल येथील डॉ. संदीप अट्टावार, डॉ. विजील राहुलन आणि डॉ. प्रभात दत्ता यांनी खूप चांगले उपचार केलेत. मी बेडवरच होतो. गळ्यात सेंटर लाइन होतीच. लिक्विड डायट सुरूच होतं. मी डावीकडे अथवा उजवीकडे पाहू देखील शकत नव्हतो. हॉस्पिटलतील ब्रदर्स आणि सिस्टर्स यांच्या शिप्ट चेंज व्हायच्या तेव्हा कुठे वेळ कळायची. सॅच्युरेशन कधी वर तर कधी खाली यायचा.

हैदराबाद येथील अनुभव
दवाखान्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज त्यात या मशिनचा आवाज. त्याचा खूप त्रास व्हायचा. पण मी सगळ्या मशिनरीजशी दोस्ती करून घेतली होती. आपल्याला जिवंत राहायचं आहे. घरी जायच आहे म्हणून आता हेच आपले घर आहे हे मनाला स्वीकार करून घेतल होतं. श्वास घ्यायला देखील त्रास होत होता. हॉस्पिटलमधील सिस्टर आणि ब्रदर्स मला ‘Take Breath slowly’ म्हणून मला श्वास घ्यायला सांगायचे.

माझ्या समोरच्या बेडवरचा पेशंट एक्मो मशिनवर होता. त्याची परिस्थिती पाहून धीर खचत होता. हात-पाय पूर्ण गळले होते. वजन २० ते २५ किलोपर्यंत कमी झालं होतं. पहाटे पहाटे हॉस्पिटलचे ब्रदर्स-सिस्टर्स मला आंघोळ घालून द्यायचे. खूप सेवा करायचे. तिकडील खूप स्टॉफ हा साउथचाच होता. खूप छान आणि नम्र होते. काही दिवसांनी माझा नियमित आहार सुरू झाला. रोज सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉलिंगद्वारे फॅमिलीशी माझ बोलणं व्हायचं. यावेळेची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो. त्यावेळेस अक्षरशा फिजीओथेरपीचे डॉक्टर मला लहान मुलांना जसं आपण उचलून पाळण्यात ठेवतो तसेच ते मला उचलून सोफ्याच्या चेअरवर बसवायचे. नंतर मग लॅपटॉपमध्ये व्हिडीओ कॉलकरून द्यायचे. माझी पत्नी, साळा, साळी, काकासासरे हैदराबादमधील एका हॉटेलमधे राहात होते.

फिजिओथेरपीचे डॉ. रणजीत, डॉ. अशोक, डॉ. कादर यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. माझी पत्नी साक्षी आणि साळा कोरोना किट घालून मला भेटायला येत. मला वाचन म्हणून माझ्या साळीने माझ्यासाठी श्री श्री रविशंकरची आर्ट ऑफ लिव्हिंगची “सोर्स ऑफ लाइफ” ही पुस्तक वाचायला पाठवली होती. ती वाचून मी अजून पॉझिटिव्ह झालो. डॉक्टरांना माझं फार कौतुक होतं. ते म्हणायचे की, आशिषची व्हिल पावर खूप स्ट्रांग आहे.

माझं हॉस्पिटलच्या स्टाफसोबत चांगलंच सूत जुळत होतं. मला गाण्याची आवड असल्याने मी जसं जमेल तसं हळू आवाजात गायचो. स्टाफची सगळी माणसं माझ्यासोबत जुळलीत. पुढे चालून ऑक्सिजनचे प्रेशर हळू हळू कमी करत नेलं. डॉक्टर औषधांवर फोकस करत होते. हॉस्पिटलमध्ये माझी ऍडमिशन लंग्स ट्रान्सप्लांटसाठी केली होती. परंतु सुदैवाने देवाच्या कृपेने, सर्वांच्या प्रार्थनेने, सर्वांच्या आशीर्वादाने लंग्स ट्रान्सप्लांट करायचं काम पडल नाही, तशी वेळसुद्धा आली नाही. सगळे KIMS चे डॉक्टर आश्चर्यचकित होते की ये लडका मिरॅकल है…त्यांनी माझी हॉस्पिटलमधे केस स्टडी साठी घेतली आहे.

अखेर जनरल वार्डमध्ये रवानगी
माझे रोज सकाळी एक्स-रे काढले जात. माझ्या छातीचे सीटी स्कॅन देखील झालं. एक दिलासा देणारी आणखी गोष्ट झाली. ती म्हणजे मला १० मे २०२१ ला जनरल वॉर्डमधे शिफ्ट करण्यात आलं. आता मला माझ्या परिवारासोबत थेट राहता येत होतं. थोड थोड बोलता येत होत. माझी अर्धांगिनी सौ. साक्षीसोबत होती. पण साळी ममता, साळा राहुल, त्याची पत्नी नीलम, माझी लहान बहीण प्रीती, माझा जावई स्वप्नील हे देखील मला बारीबारीने भेटायला यायचे. त्यांची पण सोबत होती. आता माझ नॉर्मल जेवण सुरू झालं होतं. १९ मे २०१९ ला पहिल्यांदाच मी सात मिनिट उभा राहिलो. तेव्हा प्रचंड घामाघूम झालो होतो. नंतर मला थोड चालायला लावलं.

खिडकीतून उगवता सूर्य दिसायचा. समोर साईबाबांच मंदिर देखील होतं. ते बघितलं की मनाला प्रसन्नता वाटायची. फिजिओ थेरपीचे डॉक्टर्स मला रोज ऑक्सिजन सिलिंडरच्या सपोर्टने चालवायचे. रोज व्यायाम, योगा आणि ब्रेथिंग एक्सरसाइज करून घ्यायचे. माझी पत्नी साक्षीसुद्धा ते माझ्याकडून रोज सकाळी-संध्याकाळी योगा-प्राणायम करून घ्यायची. पुढे मला हार्टचा त्रास व्हायला लागला.

फिजिओ थोडं कमी करण्यात आलं. मी नैसर्गिकरित्या दुरुस्त व्हावं यावर सर्वां डॉक्टरांनी भर दिला. त्यात माझा जुना मुळव्याधीचा त्रास पुन्हा सुरू झाला. रक्तस्त्रात होत होता. लंग्स,कार्डिओ, ग्रॅस्ट्रोइंटोलॉजिस्ट यावर डॉक्टरचे मार्गदर्शन सुरू होते. २६ मे २०२१ ला मुळव्याधीसाठी तपासणी झाली. ती ग्रेड-३ गेली होती. सिटी स्कॅन झाला. त्यात रक्ताच्या गुठल्या झाल्याचं कळलं.

नंतर २८ मे २०२१ रोजी डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यायचा ठरवल आणि एक महिना तरी हैदराबादला राहण्यास सुचवलं. तेव्हा आम्ही हैदराबादला माझ्या साळ्याच्या सासरी राहण्याचं ठरवलं. मला दोन लिटर ऑक्सिजन सपोर्टवर डॉक्टरांनी सुट्टी दिली आणि मग मी ऑक्सिजनच्या सपोर्टने माझ्या पत्नी, साळ्यासोबत शिफ्ट झालो. माझ्या साळ्याची सासू किरण ऑण्टी, पूजा भाभी, विशाल, रिषभ, नीलम या सगळ्यांनी माझी खूप सेवा केली. माझा साळा राहुल याने ऑक्सिजन सिलिंडरपासून सगळी व्यवस्था त्या घरात माझ्यासाठी केली होती.

माझा लहान जावई स्वप्नीलने ऑक्सिजन कॉनसेन्टरेटर माझ्याकरिता पाठवलं होतं. माझ्या साळ्याच्या सासरी त्याच्या साळ्याच्या दोन छोट्या मुली होत्या. तविशा आणि धनिका त्यांच्यासोबत दिवस कसा जायचा कळत नव्हतं. दोन्ही खूप क्युट आहेत. माझ्यासोबत एक्सरसाइज करायचे. लुडो, उनो, sequence असे काही गेम्स खेळायचे. माझी पत्नी साक्षी माझ्याकडून नियमित योगा, प्राणायम, वॉकिंग हे सगळ करून घ्यायसची. रोज ऑक्सिजन सिलिंडरच्या सपोर्टने चालवायची.

तिकडे टाइम पास म्हणून एक जुनी सिरीज म्हणून नेटफिल्सची “मनी हाईस्ट” सगळे पार्ट संपवलेत. अशा २-३ वेगळे सिरीजसुद्धा संपवलेत. मी नेमका बरा त्यांच्या घरीच झालो. कारण इतक्या दिवसानंतर मी घरी परतलो होतो. डिस्चार्ज झाल्यानंतर दोनदा तपासणीसाठी हॉस्पिटलला गेलो. नंतर जून २०२१ च्या शेवटी हैदराबाद सोडण्याची डॉक्टरांकडून नागपूरला आपल्या घरी जायची परवानगी मिळाली. ऑक्सिजनचा सपोर्ट होताच नागपूरला आल्यानंतर जुलै २०२१ ला सिटी स्कॅन केलं. रिपोर्ट नॉर्मल आला. घरी आल्यानंतर सुद्धा दोन महिने ऑक्सिजन सुरू होता.

नियमीत व्यायाम आणि प्राणायाम…
नागपूरला विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. दीपक मुथरेजा आणि KIMS च्या डॉक्टरांच्या कन्सल्टनने सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा सपोर्ट हळू हळू कमी करायला सांगितले. नंतर ते पूर्णपणे निघालं. मी नियमित चालायचो. योगा आणि प्राणायाम करायचो. योग्य तो आहार घ्यायचो. नंतर काही दिवसाने नागपुरात डेंगूची साथ चालू झाली होती. तेव्हा मला पण डेंगूचे सिमटम्स आलेत. प्लेटलेट्स काउंट कमी झालेत. मग डॉ. आशिष गांजरे सरांच्या कन्सलटेशन आणि त्यांनी दिलेल्या औषधाने मी बरा झालो.

नंतर हैदराबाद KIMS येथील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी लंग्स फिब्रोसिसचे औषध बंद करायला सांगितले आणि मुळव्याधीचं ऑपरेशन करायला सांगितल. अखेर ३० ऑक्टोबर २०२१ ला माझं ऑपरेशन झालं. या दरम्यान माझ्या शरीरावरील जुनी त्वचा निघून नवी त्वचा येत होती. कारण देवाने दिलेला माझा हा दुसरा जन्म किंवा पुर्नजन्म म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटतं.

पैसा जरी अमाप खर्च झाला तरी मी नशीबवान आहो की, मी आज जिवंत आहो. सगळ्यांसाठी रिप्लेसमेंट शक्य आहे, परंतु फॅमिलीसाठी नाही. शेवटी म्हणतात ना ‘जान है तो जहां है’ हे सत्य आहे. हैदराबाद येथील KIMS हॉस्पिटल येथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉ.संदीप अट्टावार यांनी मला म्हटल होत की, ‘आशिष, तू एक भगवान का चमत्कार है. अभी अपने जीवन में गुड लाइफ स्टाइल, गुड डायट और गुड रिहॅबिलेश ये सब करना’, माझ्या या सगळ्या प्रवासात माझी पत्नी साक्षी, माझा सगळा परिवार आणि विशेषत: मला जीवदान देणारा माझा साळा राहुल यांचे योगदान अविस्मरणीय आहे.

माझे सगळे जवळचे लोक नसते तर चित्र काही वेगळंच राहीलं असतं. देवाची कृपा, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि जीवलगांच्या स्नेहामुळेच मी मृत्यूच्या दाढेतून परतलो. या सर्वांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. Radiance आणि KIMS Hospital च्या Doctors, Sisters, Brothers, Ward Boy ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद… काहींची नावे सुटली असतील तरी ती माझ्या ह्रदयात कोरली गेली आहेत. ज्यांचे नातलग या आजारात गेलेत, त्यांचे दू:ख मी समजू शकतो. करोनाला गंभीरतेनेच घ्या. दोन्ही डोज पूर्ण करा. मी या अग्निदिव्यातून निघालो. आयुष्य खूप सुंदर आहे. मनात इवलीशीही खंत न ठेवता मी ह्रदयापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो.

सर्वांनी वॅक्सिनचे दोन डोस अवश्य घ्या…
नवीन व्हेरिएन्टमुळे पुन्हा एकदा तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्यातरी वॅक्सिन हा एकच उपाय आहे. त्यामुळे लोकांनी न चुकता वॅक्सिनचे दोन्ही डोस अवश्य घ्या. आयुष्य सुंदर आहे.
– आशिष पेढेकर

आशिष प्रकाश पेढेकर
नागपूर
मो. 9881158611

Comments are closed.