वणीहून यवतमाळला जाणा-या मालवाहू वाहनाने घेतला अचानक पेट
बोटोणीजवळील घटना, ठाणेदार यांच्या प्रयत्नामुळे आग विझवण्यात यश
भास्कर राऊत, मारेगाव: वणीहून यवतमाळ येथे निघालेल्या एका मालवाहू वाहनाने बोटोणीजवळ अचानक पेट घेतला. आज दुपारी 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारेगावचे ठाणेदार यांच्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मालवाहूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की शंकर चेंडबाजी वाघाडे हा वणीतील गोकुल नगर येथील रहिवाशी आहे. तो आज बुधवारी दिनांक 30 मार्च रोजी मालवाहू वाहन टाटा एक्स (MH29 BG4818) घेऊन यवतमाळ येथे वाहनाचे पासिंग करण्यासाठी जात होता. दुपारी 11.45 वाजताच्या सुमारास बोटोणीजवळ धावत्या वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक व वाहक दोघेही वाहनाबाहेर आले. त्यांनी माती व झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
वाहनाने पेट घेतल्याचे माहिती होताच घटनास्थळी तिथे अनेक लोक गोळा झाले होते. दरम्यान एका ऑटो चालकाने कॉल करून याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांना दिली. ठाणेदार पुरी यांनी मारेगाव येथून वाहनाने पाणी नेले व वाहन विझवण्यासाठी प्रयत्न केले.
तापमानात खूप वाढ झाल्याने वाहनाने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या अपघातात समोरचा अर्धाअधिक भाग जळून खाक झाला. दरम्यान मारेगाव येथे आग विझवण्याची व्यवस्था नसल्याने वणीहून अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.
हे देखील वाचा:
ट्रॅव्हल्सच्या वाहकाने गहाळ केले 1 लाख रुपयांचे मोबाईलचे पार्सल
Comments are closed.