आमदार साहेब ..! होत नसेल तर राजीनामा द्या- राजू उंबरकर

तब्बल 6 तास दवाखान्यात मृतदेहाची हेळसांड, आरोग्य सेवेबाबत मनसे आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: जीवनाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र डॉक्टर हजर नसल्यामुळे त्याचा मृतदेह सहा तास रुग्णालयात हेळसांड होत राहिली. जिवंतपणी तर चांगली आरोग्यसेवा नाहीच मात्र मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार नुकताच मारेगाव येथे घडला. या घटनेमुळे व्यथित मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मारेगाव येथे पत्रकार परिषद घेतली. वणी विधानसभा मतदारसंघात नागरिकांची हालअपेष्टा होत असून यासाठी सर्वस्वी लोकप्रतिनिधी जवाबदार असल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केला. आमदार साहेब..! तुमच्याशी काम होत नसेल तर स्वतःहून राजीनामा द्या. असे खुले आवाहन यावेळी उंबरकर यांनी केले.

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका युवा शेतकऱ्यांनी 21 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मागील 15 दिवसांपासून रजेवर असल्यामुळे मृतदेह तब्बल 6 तास दवाखान्यातच पडून राहिला. या घटनेची माहिती मिळताच मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर मारेगाव पोहचले. राजू उंबरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करुन धारेवर धरले. मनसेची आक्रमक भूमिका बघून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पांढरकवडा येथून तात्काळ चिकित्सक पाठवून मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

या प्रकारानंतर मारेगाव येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघात सर्व विभाग प्रभारच्या भरवशावर असल्याची माहिती दिली. वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण, महसूल, कृषी, भूमिअभिलेख, बांधकाम विभाग, पंचायत समितीसह इतर कार्यालय प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर सुरु आहे. अधिकारी व कर्मचारी लोकप्रतिनिधी याना जुमानत नाही. कोणत्याही कार्यालयात लाच दिल्याशिवाय काम होत नाही. मारेगाव तालुक्यात सतत आत्महत्या होत आहे. असे असताना या भागाचे आमदार मात्र निष्क्रिय आहे. असा आरोप राजू उंबरकर यांनी केला.

… तर मनसे स्टाईल धडा शिकवू – राजू उंबरकर
येत्या आठ दिवसात मतदारसंघातील सर्व कार्यालयांना आम्ही भेट देणार. कार्यालयीन वेळेवर जर डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी हजर नसेल तर आम्ही मनसे स्टायल आंदोलन करु. नागरिकांच्या हितासाठी आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तालुक्यातील नागरिकांचे जर हाल होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही.
राजू उंबरकर – राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

Comments are closed.