जितेंद्र कोठारी, वणी: वणी-ब्राह्मणी रोडवर आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या अपघातात ब्राह्मणी येथील तरुण जागीच ठार झाला. ब्राह्मणी रोडवरील इंदिरा जिनिंगसमोर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच गावातील लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती.
सविस्तर वृत्त असे की आकाश अनिल डाखरे (22) हा ब्राह्मणी येथील रहिवाशी होता. तो गुप्ता कोलवॉशरी येथे नोकरी करायचा. आज सकाळी तो काही कामानिमित्त स्प्लेंडर (MH29 BH1608) या दुचाकीने वणी येथे गेला होता. वणीहून गावी परतताना सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळाजवळील नागरिक गोळा झाले. त्यांनी अपघाताबाबत गावातील लोकांना माहिती दिली. गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही लोकांनी ऍम्बुलन्सला बोलावले. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. हा अपघात इतका जबर होता की अपघातामुळे घटनास्थळी ठिकठिकाणी मांस पडलेले होते. वृत्त लिहेपर्यंत आकाशचा मृतदेह घटनास्थळीच होता.
ट्रकने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज
या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या ट्रकची वाहतूक होते. त्यामुळे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळाजवळच जिनिंगचा सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने त्यात हा अपघात कैद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments are closed.