जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील प्रसिध्द आणि जागृत असलेले देवस्थानाच्या विकासासाठी तब्बल 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे वणी विधानसभेतील चार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ही निधी मिळाली आहेत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ही निधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वणी तालुक्यातील जगन्नाथ बाबा तीर्थक्षेत्र भांदेवाडा येथे 2 कोटी रुपयांच्या निधीतून सभागृह व इतर विकास कामे केली जाणार आहे. तसेच जैताई माता देवस्थान वणी साठी 1 कोटी, रंगनाथ स्वामी देवस्थान वणी साठी 1 कोटी रुपये व भवानी माता देवस्थान गोडगाव येथे सभागृहसाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. असे या चार ठिकाणी सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी एकूण 5 कोटीचा निधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी खेचून आणला आहे.
सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा मार्फत होणार असून चालू आर्थिक वर्षात बांधकाम सुरू होणे अपेक्षित आहे. संबंधित नियम, अटी व शर्थीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांनी काम करून घेण्यासाठी आदेश दिले आहे. एका आर्थिक वर्षात तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच उपलब्ध झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed.