बिग ब्रेकिंग – खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. दिल्लीच्या गुरूग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वडिलांच्या निधनानंतर शनिवार 27 मे रोजी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने नेण्यात आले होते.
दिल्लीच्या मेदान्ता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले. बाळू धानोरकर यांना जीवनरक्षक प्रणाली ( व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरात्री दरम्यान त्यांची प्रकृति आणखी खालावली होती. दरम्यान आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज दिनांक 30 मे रोजी दुपारी 2 ते दु. 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी वरोरा येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. 4 वाजता त्यांच्यावर वरोरा येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
बाळू धानोरकर यांचा अल्प परिचय व राजकीय प्रवास
सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण हे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे झाले. 10 वी नंतर त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक फार्मसी कॉलेजमधून डी फॉर्म केले. पुढे त्यांनी भद्रावती येथील विवेकानंद कॉलेज येथून 12 वी व बीए शाखेत पदवी प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर त्यांनी वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी देखील चालवली. मात्र दरम्यानच्या काळात ते मद्यविक्रीच्या व्यवसायात आले. त्यांनी भद्रावती येथे बार सुरू केला. त्यानंतर ते याच क्षेत्रात होते. भद्रावती, वणी येथे त्यांचे बार व शॉप आहे.
कॉलेजच्या काळापासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. व्यवसायात स्थिर झाल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एका शिवसैनिकाकडे जे आवश्यक गुण असायला हवे ते सर्व त्यांच्यात होते. अल्पावधीतच आपल्या आक्रमक बाण्याने त्यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांचा तडफदारपणा बघुन पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष हे पद देखील दिले. 2009 मध्ये ते शिवसेनेकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. मात्र पहिल्या प्रयत्नात त्याचा अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत त्यांना तिकीट दिले. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव करत ते आमदार झाले.
शिवसेनेला जय महाराष्ट्र
निवडून आल्यानंतर ते भद्रावतीतून वरोरा येथे स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात सेना आणि भाजप यांची युती तुटणार अशी चर्चा होती. पक्षाने त्यांना लोकसभेसाठी तयार राहण्याचा आदेश दिला. त्या प्रमाणे त्यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात लक्ष घालणे सुरू केले. मात्र ऐन वेळी सेना भाजपची युती शाबूत राहली. मात्र हंसराज अहिर यांच्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. मात्र दुसरीकडे काँग्रेसकडे नेता नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधत त्यांना काँग्रेसचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले.
ती व्हायरल ऑडिओ व काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार
लोकसभेचे काँग्रेसतर्फे तिकीट कन्फर्म झाल्यावर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना काँग्रेसने ऐन वेळी तिकीट नाकारले. यावेळी एका कार्यकर्त्याची अशोक चव्हाण यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यामुळे बाळू धानोरकर यांना प्रचंड सहानुभूती मिळाली. त्याचा व अहिर यांच्या बद्दल असलेल्या ऍन्टी इन्कम्बसीचा फायदा घेत बाळू धानोरकर भरगोस मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेसची निवडून आलेली एकमेव जागा ही बाळू धानोरकर यांची होती.
Comments are closed.