वणी बहुगुणी डेस्क : सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखाली घासही जात नाही. त्यामुळे पालक त्यांच्या हातात मोबाईल देऊन घास भरवतात. मात्र लहान मुलांचे हे लाड त्यांच्या जीवावर बेतणारे असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे पालकांनो सावधान..! तुमचं लाड मुलांना घातक ठरत असल्याचे सांगण्याची वेळ आली आहे.
लहान मुलांमध्ये मोबाइल फोन वापरण्याचे बरेच दुष्परिणाम समोर आले आहेत. मोबाइल फोनमधून निघणारी रेडिएशन लहान मुलांसाठी खूप हानिकारक मानली जाते. मुलांना लवकर चष्मा लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि कोरडेपणा यांसारख्या अनेक समस्या सतत मोबाईल बघण्याच्या सवयीमुळे उद्भवत आहेत. मोबाइलमध्ये व्यस्त असताना लहान मुलांना खाण्यापिण्याचा आणि झोपण्याचाही होश नसतो. त्यामुळे त्यांचा मेंदूला थकवा येऊन मानसिक व शारीरिक विकाससुद्धा बाधित होत आहे.
लहान मुलं स्क्रिनच्या अगदी जवळून मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मायोपिया सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मायोपिया या आजारामध्ये मुलांच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढल्यानं प्रतिमा रेटिनापेक्षा थोडी पुढे तयार होते. त्यामुळे दुरवरील वस्तू पाहण्यास अडचण होते. अनेक संशोधनातून असं समोर आले आहे की, मोबाईलची स्क्रिन ही डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अशातच ज्या लहान मुलांना चष्मा आहे, त्यांचा नंबर खूप लवकर वाढतो.
पालकांनी काय काळजी घ्यावी ?
मोबाईल हे प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मुलांसमोर पालकच जर सतत मोबाईलवर व्यस्त राहिले तर त्याचं अनुकरण मुलंही करतात. मात्र लहान मुलांना समजावून सांगण हे पालकांचे काम आहे. मोबाईल वापरावर नियम लावले तरच मोबाईलचं व्यसन सुटण्यास मदत होईल. जेवताना, झोपताना, बाहेर खेळताना कटाक्षाने मोबाईलचा वापर टाळावा असा नियम घरात लावावा. तसेच लहान मुलांनी हातात मोबाईल घेतलाच तरी त्यासाठी वेळ ठरवून द्यावी. जेणेकरून मुलं फारवेळ मोबाईलवर राहणार नाहीत. ज्या ठिकाणी लहान मुलं अभ्यासाला बसतात, त्या ठिकाणी व्यवस्थित उजेड किंवा प्रकाश पडतोय की नाही ते पाहावं. मुलांच्या हातात मोबाईल कमी द्यावा. तर पालकांनो.. आताच सावध व्हा, आणि आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
Comments are closed.