कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक, भरपावसात रास्ता रोको आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ असलेल्या रुख्माई कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसद्वारा मंगळवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तीव्र आंदोलन करण्यात आले. कोलवॉशरीमुळे होणारे वाढते प्रदूषण व राजूर फाट्यावर होणा-या अपघाताविरोधात हे आंदोलन करण्यात आले. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे व झरी एपीएमसीचे अध्यक्ष राजीव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरपावसात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे 1 ते दीड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर नायब तहसिलदार विवेक पांडे तसेच कोलवॉशरी प्रशासनातील अधिका-यांनी आंदोलकांशी चर्चा केली. कोलवॉशरी प्रशासनाने तातडीने समस्या निकाली काढण्याचे व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

राजूर फाट्याजवळ रुख्माई नामक कोलवॉशरी आहे. या कोलवॉशरीमुळे मोठ्या प्रमाणात कोळशाची धुळ वातावरणात मिसळत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर काळवंडला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे थर साचले आहे. विशेष म्हणजे हा स्पॉट अपघातासाठी कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांना जीव देखील गमावावा लागला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या ठिकाणी चिखल तयार झाले आहे. त्यामुळे दुचाकीचे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे.

कोलवॉशरी ते मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट क्राँकीटीकरण करण्यात यावे, कोलवॉशरीसमोर असलेली धूळ नियमीत साफ करावी, दिशादर्शक फलक लावावा, कोलवॉशरीतून होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, कोळशाच्या ट्रकवर ताडपत्री झाकली जात नाही. यावर उपाययोजना करावी, कोलवॉशरीसमोरील रस्त्यावर हॅलोजन लाईट लावण्यात यावे अशा अनेक मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

आंदोलनात ओम ठाकूर, राकेश खुराना, डॅनी सँड्रावार, घनश्याम पावडे, मारोती गौरकार, रवि देठे, बंटी ठाकूर, सचिन देशपांडे, डेविड पेरकावार, अमित संते, अशोक निगम, किशोर ढुमणे, प्रदीप खेकारे, अशोक नागभीडकर, दुष्यंत जयस्वाल, फैजल खान यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.