वणीतून निघाली गुरुकुंज मोझरीसाठी पायदळ वारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विठ्ठलवाडी येथून मंगळवारी दिनांक 18 जुलै रोजी विठ्ठलवाडी येथील सामुदायीक प्राथना मंदिर येथून गुरुकुंज मोझरी साठी पायदळ वारी निघाली. ही वारी 25 जुलै रोजी गुरुकुंज मोझरी येथे पोहोचणार आहे. या वारीत तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक सहभागी झाले आहे गाव तिथे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना, राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार, ग्रामगिता जीवन विकास परीक्षेचा प्रचार, व्यसनमुक्ती इत्यादींसाठी ही दिंडी आयोजित करण्यात आली आहे.

खंजीरी व वाद्याच्या गजरात मंगळवारी सकाळी 7 वाजता तुकडोजी महाराजांची पालखी वणीतून निघाली. मंगळवारी रात्री ही वारी मार्डी येथे पोहोचली. तर आज वारीचा रिधोरा येथे मुक्काम आहे. त्यानंतर राळेगाव, कळंब, बाभुळगाव, धामनगाव रेल्वे, जहांगीरीपूर असा पायदळ प्रवास करीत दिंडी 25 जुलै रोजी रात्री गुरुकुंज मोझरी येथील आश्रमात पोहोचणार आहे. 26 तारखेला प्रचारकांतर्फे राष्ट्रसंतांच्या चरण पादुकाचे दर्शन घेतले जाणार आहे.

या दिंडीत सुमारे 70 प्रचारक व भाविक सहभागी झाले आहे. भाविकांची ठरलेल्या ठिकाणी नाष्टा, भोजन व रात्री झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारीत गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक मारोतराव ठेंगणे, तालुका सेनाधिकारी, दिलीपराव डाखरे, तालुका प्रचारक अरविंद दुर्गे, जिल्हा भजन प्रमुख अनिल बोढाले, यांच्यासह आजीवन प्रचारक विजया दहेकर, मज-याचे सरपंच अनिल देऊळकर, श्रीमती बलकी, श्रीमती पारखी, प्रविण पेचे, प्रकाश रिगोले यांच्यासह संपुर्ण गुरुदेव प्रचार वणी तालुका कार्यकारिणी सहभागी झाली आहे.

दिंडीचे वनोजा (देवी) येथे स्वागत करण्यात आले.

Comments are closed.