मुकुटबन येथील बीएस इस्पातचा कोळसा घोटाळा पोहोचला विधानसभेत

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन येथील बी.सी. इस्पात कंपनीने 40 हजार मेट्रीक टन कोळशाचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे व आ. सुनील केदार यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना केली होती. वडेट्टीवार यांच्यातर्फे ही लक्षवेधी मांडण्यात आली. त्यावर अवैध वाहतूक प्रकरणी कंपनीकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी भादंविच्या कलम 137 नुसार गु्न्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही विपरीत बाबी आढळून आल्यास त्या खनिकर्म कार्यालयास कळवावे अशी सूचना जिल्हा खनिकर्म अधिकारी व पोलीस विभागाला केल्याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

काय आहे हे प्रकरण?
11 जानेवारी 2023 रोजी मुकुटबन येथून 8 कोळसा भरलेले ट्रक वणीच्या दिशेने येत होते. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता यातील कोळसा हा मुकुटबन येथील बीसी इस्पात कंपनीतून आला असून सदर कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या ट्रकवर 2,83,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला व याची माहिती खनिकर्म अधिकारी यांना देण्यात आली.

जिल्हा खनिकर्म विभागातर्फे इस्पात कंपनीकडून खुलासा मागवण्यात आला. मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याचे खनिकर्म विभागाला आढळून आले. त्यामुळे कंपनीकडून 5,39,285 रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान इस्पात कंपनीतील गैरव्यवहार काही केल्या कमी होताना दिसत नव्हता. त्यामुळे 12 जून रोजी पांढरकवडा येथील आरटीआय कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी इस्पात कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून जिल्हा खनिकर्म अधिका-यांच्या पथकाने खाणीची पाहणी केली असता प्रत्यक्षात नोंद केलेल्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा खाणीत कमी साठा असल्याचे आढळून आला. ही तफावत सुमारे 40 हजार टन इतकी होती. ज्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. तसेच या ठिकाणी आढळून आलेला कोळसा हा दगड, चुरी मिश्रीत निम्न दर्जाचा असल्याचे सकृतदर्शनी आढळले. याबाबत कंपनीला खुलासा मागवण्यात आला. मात्र खुलासा असमाधानकार असल्याने पुढील कार्यवाहीसाठी संचालक भूविज्ञान व खनिकर्म संचनालय, नागपूर कडे प्रकरण सोपवण्यात आले. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

40 हजार टन कोळशाचा गैरव्यवहार !
गेल्या अनेक महिन्यांपासून मुकुटबन येथील बीएस इस्पात ही कंपनी वादग्रस्त ठरताना दिसत आहे. सदर कंपनीने 40 हजार टन कोळशाचा गैरव्यवहार केला असून ज्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी तक्रारीच्या आधारावरून केला. या कंपनीची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास कंपनीचे अनेक गैरव्यवहार समोर येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी सूचना आ. वडेट्टीवार यांनी लक्षवेधीतून केली.

बी एस इस्पात लिमिटेड ही कंपनी झरी तालुक्यातील मुकटबन येथे आहे. या कंपनीला 275 हेक्टर क्षेत्रावरील कोळसा खंड केंद्र शासनाने 2015 मध्ये 30 वर्षांसाठी आणि स्व-वापरासाठी लीजवर दिला आहे. खनिकर्म योजनेनुसार या कोळसा खंडातून वार्षीक 2 लाख 70 हजार मेट्रीक टन कोळसा उत्खनणाची मर्यादा आहे. मात्र वारंवार ही कंपनीत  गैरव्यवहार होताना आढळून येत आहे. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे शिवाय पर्यावरणाचा देखील -हास होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.