बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक वर्षांपासूनची वणीत उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी होती. मात्र या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले होते. या प्रश्नावर मनसे नेते राजू उंबरकर यांनी मुंबई येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. दरम्यान तानाजी सावंत यांनी येत्या आठ दिवसात कार्यवाही होणार, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे वणीकरांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सध्या वणीत ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. मात्र परिसराची लोकसंख्या, रुग्णसंख्या पाहता अनेक वर्षांपासून वणीत उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे. यासाठी राजू उंबरकर यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. तर 2021 मध्ये त्यांनी 5 दिवसांचे उपोषण केले होते. याशिवाय त्यांनी संबंधीत विभागाशी पत्र व्यवहार करत पाठपुरावा देखील केला होता. नुकतेच राजू उंबरकर यांनी मुंबई येथे जाऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.
भेटीत उंबरकर यांनी परिसरात उपजिल्हा रुग्णालयाची का गरज आहे? याबाबत चर्चा केली. चर्चेनंतर सावंत यांनी येत्या 8 दिवसात यावर कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन दिले. ग्रामीण रुग्णालयात खाटांची व तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णाला बाहेर ठिकाणी रेफर करावे लागते. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास रुग्णालयातील खाटांची संख्या व तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचा फायदा काय?
ग्रामीण रुग्णालयापेक्षा अधिक सुविधा आणि उपचार विभाग उपजिल्हा रुग्णालयात असते. ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा, 4 तज्ज्ञ डॉक्टर असते. तर उपजिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या किमान 50 असते व तज्ज्ञ डॉक्टर (स्पेशलिस्ट), स्टाफची संख्या अधिक असते. सध्या यवतमाळ जिल्ह्यात पूसद, दारव्हा व पांढरकवडा येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. तर 100 खाटांचे एकही उप जिल्हा रुग्णालय जिल्ह्यात नाही. जिल्हा रुग्णालय 200 किंवा त्यापेक्षा अधिक खाटांचे असते.
वणीत अद्यापही उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केयर सेंटर नाही. अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा यासाठी ट्रामा केअर सेंटर असते. मात्र हे सेंटर नसल्याने अपघातातील अनेक जखमींना जीव गमवावा लागतो. उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता उपजिल्हा रुग्णालय कधी सुरु होणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.