बॅनरवॉर: शिवसेनेत तिकीटासाठी रस्सीखेच की गटबाजी?
नेत्यांना प्रोटोकॉलचा विसर, बॅनरवरून फोटो गायब
विवेक तोटेवार, वणी: 27 जुलै रोजी शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहे. मात्र यातील फोटो आणि नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष करून टिळक चौकातील शुभेच्छा बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. यात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख असलेले संजय देरकर यांच्या बॅनरमधून जिल्हाध्यक्षांचे नाव आणि फोटो गायब आहे. तर माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या बॅनरमध्ये देरकर यांच्या फोटोला स्थान नाही आहे. त्यातच 27 जुलै रोजी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती. मात्र जिल्हा प्रमुख असलेले विश्वास नांदेकर हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही तिकीटासाठीची रस्सीखेच आहे की अंतर्गत गटबाजी या चर्चेला उधाण आले आहे.
नांदेकर विरुद्ध देरकर पोलिटिकल वॉर
एक महिन्याआधी संजय देरकर यांनी मोफत विजेसाठी स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात केली. ही मोहीम त्यांनी स्वतंत्रपणे सुरु केली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय देरकर यांच्यावर कठोर टिका होती. देरकर हे नेहमी निवडणुकीच्या ऐन तोंडावर कार्यरत होतात व कायम पक्ष बदलवतात असा घाणाघात त्यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. त्यामुळे पक्षातील गटबाजीचे जाहीर वाभाडे निघाले होते. त्यानंतर हे पोलिटिकल वॉर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
प्रोटोकॉलचा विसर, बॅनरबाजी सुरू
सध्या देरकर आणि नांदेकर हे स्वतंत्रपणे पक्षाचे कार्यक्रम राबवित आहेत. देरकर यांच्या उपक्रमात नांदेकर यांचा सहभाग नसतो. तर नांदेकर यांच्या उपक्रमात देरकर यांचा समभाग नसतो. या उपक्रमाच्या बॅनरवर देखील एकमेकांचा फोटो गायब असतो. कार्यकर्ते देखील राजकीय हवा बघून विभागले गेले आहेत. मात्र पक्षाचा काही प्रोटोकॉल असतो. हा प्रोटोकॉल मात्र पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच मुख्य चौकात बॅनरवरून फोटो गायब असल्याने सध्या याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
माजी आमदार विश्वास नांदेकर हे 2004 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या नेतृत्त्वात वणी विधानसभेत शिवसेना आगेकुच करीत होती. 2014 मध्ये सेनेची भाजपसोबतच युती तुटली व चारही प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला. शिवसेनेचे विश्वास नांदेकर हे दुस-या क्रमांकावर होते. अवघ्या सुमारे 5500 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी संजय देरकर हे सुमारे 31000 चौथ्या क्रमांकावर होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली होती.
2019 मध्ये ही जागा भाजपच्या क्वोट्यात गेली. त्यावेळी संजय देरकर व विश्वास नांदेकर हे अपक्ष उभे राहिले होते. यात संजय देरकर यांना सुमारे 25 हजार तर विश्वास नांदेकर यांना सुमारे 15 हजार मत मिळाले. दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली. शिवसेना महाविकास आघाडीत गेली. सध्या वणीची जागा शिवसेनेच्या क्वोट्यात जाणार असा दावा शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.
दारव्हा, दिग्रसची जागा काँग्रेसला देऊन त्या बदल्यात वणीची जागा घेण्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरीत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता सर्वच शिवसेना नेते तिकीटासाठी फिल्डिंग लावत आहे. तिकीटासाठीच्या रस्सीखेचेतून अंतर्गत गटबाजी देखील समोर येत आहे. आता पक्षश्रेष्टी यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.