वणी येथील महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद, 3600 रुग्णांची तपासणी

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे माझी जबाबदारी - आ. बोदकुरवार

विवेक तोटेवार, वणी: वणीतील लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल येथे रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात वणी तालुक्यातील सुमारे 3600 रुग्णांनी तपासणी केली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील चमूने रुग्णांची तपासणी व उपचार केलेत. सेवा पंधरवाडा अंतर्गत तसेच पं. दिनदयाल उपाध्याय यांची जयंती व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वणी विधानसभातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 8 वाजता रुग्णांच्या नोंदणीला सुरुवात झाली. स. ठिक 10 वाजता शिबिराला सुरुवात झाली. 11 वाजता उद्घाटन सोहळा पार पडला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मंचावर विजय पिदूरकर, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, दिनकर पावडे, गजानन विधाते, संध्या अवतारे, मंगला पावडे, ललितारेड्डी बोदकुरवार, लिशा विधाते, उमा पिदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे माझी जबाबदारी – आ. बोदकुरवार
उद्घाटन प्रसंगी बोलताना आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की भाजप हा सेवा कार्याशी निगडीत पक्ष आहे. जनसेवेचे व्रत घेऊन आमची वाटचाल सुरु असते. वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा व इतर फॅक्टरी आहेत. त्यामुळे इथे प्रदूषणाची समस्या आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एक आमदार म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे माझी जबाबदारी आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी हे शिबिर घेण्यात आले. यापुढेही असे सेवाभावी उपक्रम सुरुच राहणार, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

शिबिरात रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, नाक कान घसा इत्यादीं रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. अभिषेक इंगोले व रुग्ण संपर्क अधिकारी एल पी शिंगणे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. सावंगी येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सर्व रुग्णांची तपासणी व उपचार केलेत. शिबिरात सुमारे 300 रुग्णांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या रुग्णांना दिलेल्या तारखेला सावंगी येथे शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन वासेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयमाला दरवे यांनी मानले. सर्व रुग्णांसाठी व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींसाठी आयोजकांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. प्रेमानंद आवारी, केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशन वणी, आशा वर्कर, गट प्रवर्तिका, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांची चमू तसेच भाजपचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.