घरकुलाच्या रखडलेल्या हप्त्यासाठी फाल्गुन गोहोकार यांचे आमरण उपोषण
10 ऑक्टोबर पर्यंत मिळणार अनुदान. लेखी आश्वासनानंतर संध्याकाळी उपोषण मागे...
बहुगुणी डेस्क, वणी: अनुदानाचा हप्ता रखडल्याने घरकुल लाभार्थीचे बांधकाम थांबले आहे. थकलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. संध्याकाळी गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. दिलेल्या वेळेत जर आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला.
वणी तालुक्यामध्ये शबरी, रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी आहेत. या अनुदानाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाला. पण उर्वरित अनुदान प्राप्त न झाल्याने या घरकुलांचे बांधकाम थांबलेले आहे. लाभार्थींना भर पावसाळ्यात आपला संसार उघड्यावर करावा लागत आहे. मनसेने वारंवार हा प्रश्न उचलला. कधी मोखिक तर कधी पत्रव्यवहार करून रखडलेला हप्ता देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. अखेर मनसेतर्फे बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
10 ऑक्टोबर पर्यंतचे आश्वासन – फाल्गुन गोहोकार
आमरण उपोषण सुरु झाल्यावर संध्याकाळी गटविकास अधिकारी यांनी रखडलेल्या अनुदानाचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात येत आहे. दिलेल्या वेळेत जर आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल.
मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात व फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. प्रवीण कळसकर, योगेश काळे, प्रतीक बुरडकर, मंगेश येटे यांच्यासह घरकूल लाभार्थीनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
Comments are closed.