नारीशक्तीची कमाल… दारू विक्रेत्याच्या घरी धाड

घरात दारू सापडताच आरोपी फरार

बहुगुणी डेस्क, वणी: अवैधरित्या दारू विकणा-याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी दारूसाठा जप्त केला. गावातील महिलांच्या पुढाकारातून ही कार्यवाही करण्यात आली. झरी तालुक्याताल वल्हासा येथे रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे घरी दारू सापडताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी दीपक किसन गाडगे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दीपक किसन गाडगे (35) रा. वल्हासा ता. झरी येथील रहिवासी आहे. तो गावात घरून अवैधरित्या दारूविक्री करत होता. त्यामुळे गावातील तरुण मुलं, सर्वसामान्य नागरिक व्यसनाधीन झालेत. गावातील महिलांनी या बाबत वेळोवेळी तक्रार केली होती. अखेर महिलांनी दारूविक्रीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. सोमवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री मुकुटबन पोलिसांना दीपक हा अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीवरून रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक वल्हासा गावी पोहोचले.

पोलिसांनी गावातील काही महिलांना सोबत घेऊन दीपक याचे घर गाठले. तेव्हा पोलिसांना दीपक हा घराजवळील बाथरुमजवळ उभा असलेला दिसला. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात ठेवलेल्या पिशवीत देशी दारुच्या 23 बॉटल घरी आढळून आल्या. त्याला बॉटलच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे या दारूचा परवाना नव्हता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरात दारू सापडताच आरोपी फरार
घरी दारू साठा सापडताच आरोपी दीपकने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी 180 मीलीच्या 23 बॉटल ज्याची किंमत 1610 रुपये जप्त केला. आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(e) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Comments are closed.