भक्तांना विश्वासात न घेता देवस्थानाची जमीन विक्रीचा घाट !
जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या जमिनीवर कंपनीने केले कोट्यवधींच्या खनिज संपत्तीचे उत्खनन
विवेक तोटेवार, वणी: रुईकोट ता. झरी येथील संत जगन्नाथ महाराज देवस्थानाला दान स्वरुपात जमिन मिळाली आहे. सदर जमिनीचा भाविकांना विश्वासात न घेता विक्रीचा घाट सचिवांनी केल्याचा आरोप रुईकोट येथील भाविकांनी केला. देवस्थानाच्या मालकीची असलेल्या जमिनीवर एका कंपनीने खोदकाम करून यातून कोट्यवधींचे खनिज उत्खनन केले. कंपनीला हा अधिकार कुणी दिला, असा आरोप रुईकोट येथील भक्ताने पत्रकार परिषदेतून केला. वणीतील प्रसाद हॉटेल येथे बंडू देवाळकर यांनी हा आरोप केला. या प्रकरणा विरोधात बुधवारी भाविकांनी दिंडी काढून निषेध केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेण्यात आली.
काय आहे प्रकरणाची पार्श्वभूमी?
वणी तालुक्यासह झरी, मारेगाव, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यात संत जगन्नाथ महाराजांचे मोठया प्रमाणात भक्तगण आहेत. जगन्नाथ महाराज देवस्थानाला अनेक भक्तांनी देणगीच्या स्वरूपात जमीन व इतर साहित्य दिले आहे. झरी तालुक्यातील रुईकोट येथील 5 एकर जमीन कृष्णाजी मंदावार या भक्ताने सन 1974 साली संत सदगुरु जगन्नाथ महाराज देवस्थान संस्थानाला दान स्वरूपात दिली. या संस्थेचे सध्या संजय देरकर हे सचिव आहेत.
पत्रकार परिषदेत भक्त बंडू देवाळकर यांनी संजय देरकर यांच्यावर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या. वरोरा येथील बीएस इस्पात या कंपनीचे झरी येथे ही काम आहे. देवस्थानाला मिळालेली जमीन सचिवाने कंपनीच्या ताब्यात दिली. या कंपनीने सदर जमिनीवर खोदकाम करून त्यातून कोट्यवधींचा खनिज (कोळसा) काढला. संपूर्ण कोळसा निघाल्यानंतर खोदकाम बंद करण्यात आले. त्यानंतर ही जमीन विक्रीसाठी काढण्यात आली. असा खळबळजनक आरोप देवाळकर यांनी केला.
रुईकोट येथील सदर जमिनीवर झेंडा लावलेला असायचा. काही भाविक तिथे जात होते. ही जमीन देवस्थानाच्या मालकीची असल्याची माहिती आधी ग्रामस्थांना नव्हती. त्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती काढली असता ही जमीन देवस्थानाच्या मालकीची असल्याचे कळले, 17 ऑक्टोबर रोजी या जमिनीची विक्री होणार होती. परंतू याला रुईकोट येथील काही भक्तगणांनी विरोध केला. याची तक्रार सहा. निबंधक कार्यालय व धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केली. त्यामुळे ही विक्री थांबवण्यात आली, असा दावा पत्रकार परिषदेत बंडू देवाळकर यांनी केला.
विक्रीआधीच खोदकाम कसे?
सदर जमिनीची विक्री अद्याप झालेली नाही. विक्रीआधीच इस्पात कंपनीने त्यावर खोदकाम सुरु करून त्यातील कोळसा काढला. खनिज संपत्ती काढल्यानंतर या जमिनीच्या विक्रीसाठी हालचाली सुरु झाल्या. भाविकांची श्रद्धा असताना या जमिनीवर कंपनीला खोदकाम करण्याचा व त्यातून कोट्यवधींचा कोळसा बाहेर काढण्याचा अधिकार कुणी दिला. असा प्रश्न देवाळकर यांनी उपस्थित करत सदर कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली.
या पत्रकार परिषदेनंतर संजय देरकर यांनी देखील पत्रकार परिषद झाली. त्यांनी या परिषदेत देवाळकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
Comments are closed.