का झाला देरकर यांचा विजय सोप्पा…. DMK फॅक्टर ठरला वरदान…

काय आहे DMK फॅक्टर? जाणून घ्या संजय देरकर यांच्या विजयाचे विश्लेषण

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीचा संपूर्ण राज्यात सुफडा साफ झाला असताना, दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना (उबाठा) मविआचे संजय देरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दर वेळी दोन तुल्यबळ कुणबी उभे राहिले असल्यास नॉन कुणबी उमेदवार सहज निवडून येतो. हे गणित देखील यावेळी फेल पडले. त्यामुळे देरकर यांचा विजय ऐतिहासिक ठरला आहे. यात सर्वात महत्त्वाचा वाटा राहिला आहे तो डीएमके फॅक्टरचा. म्हणजे दलित, मुस्लिम व कुणबी. मात्र हा विजय केवळ या एकाच फॅक्टरमुळे नाही. तर या विजयाला अनेक कांगोरे आहेत. देरकर यांना सहज विजय का मिळाला, याच्या संपूर्ण फॅक्टरची व विविध कांगो-यांची आजच्या विश्लेषणात आपण चर्चा करणार आहोत.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेत चालला डीएमके फॅक्टर
वणी विधानसभेत डीएमके हा फॅक्टर विजयाची गणितं ठरवतो. डीएमके म्हणजे दलित, मुस्लिम व कुणबी. वणीतील तिकीट ही आघाडीकडून वामनराव कासावार या नॉन कुणबी उमेदवाराला गेल्या अनेक वर्षांपासून मिळत होती. तर युतीतर्फे कुणबी उमेदवाराला तिकीट मिळत होती. मात्र दरवेळी एक तुल्यबळ कुणबी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे व नॉन कुणबी उमेदवारांचा सहज विजय व्हायचा. (2004 मध्ये एकच कुणबी उमेदवार असल्याने विश्वास नांदेकर यांचा विजय झाला.) यावेळी संजय खाडे हे तुल्यबळ उमेदवार उभे होते. मात्र कुणबी समाज खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी समाज एकगठ्ठा देरकर यांच्या पाठिशी उभा राहिला. त्याचा मोठा फायदा देरकर यांना झाला.

दलित, मुस्लिम मते सोबत
दलित, मुस्लिम ही मते महाविकास आघाडीच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलतात. यावेळी एकही मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. तर वंचिततर्फे बौद्ध उमेदवाराला तिकीट मिळाले होते. वंचितच्या हरीष पाते यांनी बंडखोरी केली होती. मात्र वंचितला 4 हजारांचा पल्ला देखील गाठता आला नाही तर हरीष पाते यांना 2 हजारांचा पल्ला देखील गाठता आला नाही. यावरून बुद्धीस्ट व मुस्लिम मते एकगठ्ठा देरकर यांच्या समर्थनात उभे राहिल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे कुणबी फॅक्टर चालत असताना त्याला दलित, मुस्लिम मतदारांजी साथ मिळाल्याने देरकर यांच्या विजयात डीएमके फॅक्टर सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. त्याला आदिवासी मतांची देखील मोठी मदत मिळाली. आदिवासी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतानाही आदिवासी उमेदवाराला समाधानकारक मते मिळाली नाही.

महाविकास आघाडीची वज्रमुठ
युती, आघाडी झाल्यास ज्या पक्षाला तिकीट मिळते त्या पक्षाचे कार्यकर्ते व नेते काम करतात. तर मित्रपक्ष दरवेळी न्युट्रल भूमिका घेतो. दर वेळी काँग्रेसला तिकीट गेलेली असताना त्यांना राष्ट्रवादीची मदत मिळत नव्हती. मात्र यावेळी सेनेला तिकीट गेलेली असताना देखील महाविकास आघाडीची वज्रमुठ दिसून आली. महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने संपूर्ण झोकून देरकरांचे काम केले. देरकर यांचा झरी तालुक्यात जनाधार अत्यल्प होता. मात्र ही कसर वामनराव कासावार व स्थानिक काँग्रेस नेत्यांनी भरून काढली. तेच वणी तालुका व मारेगाव तालुक्यात घडले. त्याला माकप, संभाजी ब्रिगेडची चांगली साथ मिळाली. माकप व ब्रिगेडचे मतदारसंघात खूप मोठे मतदानाचे पॉकेट्स नसले तरी त्यांचे कार्यकर्ते हे कॅडरबेस आहे. ते उत्तम प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचाराचा मोठा फायदा देरकर यांना झाला. 

देरकर यांना लाभली सहानुभूती
गेल्या अनेक वर्षांपासून देरकर यांना पराभवाचा सामना करावा लागत होता. गेल्या 4 टर्ममध्ये (1999 ते 2019) देरकर यांचा दारूण पराभव झाला. 2009 मध्ये तर त्यांनी 41 हजारांचा पल्ला गाठला. मात्र विजयाने त्यांना दरवेळी हुलकावनी दिली. 1999 व 2014 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले. मात्र परिसरात राष्ट्रवादीचा जनाधार नसल्याने व त्यांना पक्षाची कोणतीही मदत न मिळाल्याने देरकरांचा पराभव झाला. यावेळी देरकर हे त्यांची अखेरची निवडणूक म्हणून लढले. आतापर्यंत मतदारांनी पक्षाचे तिकीट गेलेल्या उमेदवारांना साथ दिली. सततच्या पराभवामुळे यावेळी एक संधी देरकर यांना द्यावी. ही लोकभावना मतदारांमध्ये जागृत झाली. त्यामुळे देरकर यांच्या पाठिशी सर्वसामान्य मतदार उभे राहिले. सोबतच विश्वास नांदेकर यांनी विरोधकांचा हात पकडल्याने पक्ष सोडून गेलेले किंवा पक्षापासू दूर गेलेले शिवसैनिक देरकरांसाठी एकत्र आले. या शिवसैनिकांचा मोठा वाटा  विजयात राहिला आहे.

शेतमालाचा भाव ठरला गेमचेंजर
.या निवडणुकीत ग्रामीण भागात देरकर यांची जबरदस्त हवा होती. यात सर्वात मोठा वाटा हा शेतकरी, शेतमजुर मतदारांचा होता. सोयाबिन व कापसाला मिळालेला अल्प भाव हा देरकर यांचा पाठिंबा वाढण्यास कारणीभूत ठरला. ग्रामीण भागात देरकर यांना मोठी लीड मिळाली. यासह काही इतर मुद्दे देखील देरकर यांच्या विजयाला कारणीभूत ठरले. त्याचे विश्लेषण संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पराभवाच्या विश्लेषणात आपण करू.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )

https://www.facebook.com/groups/241871233000964

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.