निकेश जिलठे, वणी: गुरूवारी भाजीसाठी अंडे का आणले फक्त एवढी बापाने मुलाला विचारणा केल्याने चिडलेल्या मुलाने बापाला लोखंडी रॉड व विटाने मारहाण केली. या मारहाणीत बाप जखमी झाला आहे. शहरातील रंगनाथ नगर येथे दिनांक 23 जानेवारीला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत वडिलांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, किशोर मारोतराव राऊत (56) हे रंगनाथ नगर येथील रहिवासी आहे. ते रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले आहेत. त्यांचा मधला मुलगा स्वप्निल किशोर राऊत याचे वडिलांशी पटत नाही. त्यामुळे बाप लेकात कुरबुरी सुरू असते. गुरुवारी दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री जेवायला बसते. त्यांनी त्यांच्या पत्नीला जेवण वाढायला सांगितले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना अंड्याची भाजी वाढली.
किशोर यांनी पत्नीला आज गुरुवार आहे. देवाचा दिवस असताना घरी अंड्याची भाजी का केली अशी विचारणा केली. तेव्हा तिने स्वप्निल हा भाजीसाठी अंडे घेऊन आला असे सांगितले. त्यावर किशोरने त्यांचा मुलगा स्वप्निल याला याबाबत विचारणा केली असता तो चिडला. वडिलांशी वाद घालत तो त्यांच्या अंगावर धावला. त्याने वडिलांना छातीवर लाथा बक्क्याने मारहाण केली. जवळचा एक लोखंडी रॉड उचलला व तो वडिलांच्या डोक्यावर मारला. तसेच मातीची विट उचलून मारली. दरम्यान त्याच्या मोठ्या भावाने मध्ये पडून वाद सोडवला.
या मारहाणीत वडील किशोर जखमी झाले. मुलाने वडिलांना शिविगाळ करीत माझ्या घरात का राहता अशी विचारणा करीत जीवे मारण्याची धमकी दिली. किशोर यांनी पत्नीसह पोलीस स्टेशन गाठत येऊन आपल्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रारी वरून पोलिसांनी त्यांचा मुलगा स्वप्नील किशोर राऊत (29) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 (2), 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments are closed.