‘त्या’ हवालदारावर कठोर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी

लालितच्या मृत्युला 'तो' पोलिस कारणीभूत असल्याचा शिवसेना शिंदे गटाचा आरोप 

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना वणी ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने धमकी दिल्याने ही घटना घडली. त्यामुळे त्या पोलीस हवालदाराला पोलीस खात्यातून कायमचे  सेवामुक्त करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.   

यांनी ‘पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया’ या शीर्षकाची ‘दैनिक साहसिक’ या वृत्तपत्रात आलेली बातमी ललित लांजेवार यांनी एका सोशल मीडियाच्या गृपवर व्हायरल केली होती. ही बातमी विकास धडसे, शुभम सोनुले व सागर सिडाम या तिघांच्या फोटोंसह प्रकाशित झाली होती. ती व्हायरल केल्याने ते तिन्ही पोलीस कर्मचारी ललितवर प्रचंड चिडले होते. त्यानंतर विकास धडसे यांनी ललितला गाठून ॲट्रॉसिटीच्या गुन्हात तुला अडकवितो म्हणून धमकी दिली. त्या धमकीने ललित प्रचंड तणावात होता. असा आरोप करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर ललित यांनी 26 जानेवारीला पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडेसुद्धा या घटनेबाबत लेखी तक्रार दिली. परंतु काही समजायच्या आतच ललित यांचा हृदयिकाराच्या धक्क्याने 29 जानेवारी रोजी मृत्यू झाला. याबाबत विनोद मोहितकर हे पोलीस अधीक्षक यांची दोन दिवसांत भेट घेणार आहेत. शिवाय या घटनेच्या अगोदर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व तत्कालीन ठाणेदार अनिल बेहरणी यांनाही ही घटना कळविल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस शिपाई विकास धडसे यांच्यावर 7 दिवसांच्या आत कारवाई करून ललित व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या पोलीस शिपायाला खात्यातून कायमचे सेवामुक्त करण्याचा आग्रह पत्रकार परिषदेत धरला.

 

Comments are closed.