पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्पार्ट (प्रिपेड) बसविण्याचे काम सुरु आहे. हे मीटर मोबाइलप्रमाणे कार्य करणार आहे. रिचार्ज संपला की, मोबाईलची सेवा बंद होते. त्याचप्रमाणे या मीटरचा वीज पुरवठा खंडीत होईल. याचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होईल. या धोरणाच्या विरोधात आज शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वणी तालुका प्रमुख रवी बोढेकर यांच्या नेतृत्वा उपअभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार स्मार्ट मीटर्स, ट्रान्सफार्मर मीटर्स, फीडर मीटर्स व संबंधित सुविधा अशा एकूण 39 हजार 602 कोटी रुपये खर्चाच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. यात 60 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. तर उर्वरित 40 टक्के रक्कम ही महावितरण कंपनीने कर्जाद्वारे उभी करावयाची आहे. ही रक्कम त्यावरील व्याजासह कंपनी भरणार आहे. त्यासाठी कंपनी दाखल करणार असलेल्या दरवाढ प्रस्तावामध्ये या रकमेची मागणी करणार आहे.
आधीच वीज भाववाढीने त्रस्त जनतेला कराच्या रूपाने अतिरिक्त बोझा टाकण्यात येईल. सोबतच महावितरणाच्या अकाउन्ट व बिलिंग विभागातील मीटर रिडींग, वीज बिल करणारे, बिल वाटप करणारे, खंडीत वीज पुरवठा सुरु करणारे, मीटर टेस्टींग या सारख्या अनेक विभागांत कंत्राटी पध्दतीने काम करणारे हजारे कर्मचारी बेरोजगार होतील. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही जनतेच्या घरी हे मीटर लावू नये. लावल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन देतेवेळी रवी बोढेकर, दीपक कोकास माजी उप जिल्हा प्रमुख, गणपत लेडांगे तालुका संघटक, आयुष ठाकरे युवा सेना वणी विधानसभा समन्व्यक, राजू तुराणकर, माजी नगरसेवक तथा माजी शहर प्रमुख, प्रशांत बालकी, उपशहर प्रमुख, मंगेश मत्ते, सतीश जोगी, सूरज पिदुरकर,प्रवीण तुराणकर, अनिकेत बलकी, हृषीकेश रासेकर, योगेश चिकटे, हरिहर नवले, संदीप ठोडाम, चेतन लांजेवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.