विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांची सुपरफास्ट ॲक्शन सोमवारच्या सायंकाळी चर्चेचा विषय राहिला. कारणही तसंच होतं. या 8 फेब्रुवारीला एका शेतकऱ्याने कापूस विकून मिळालेले मेहनतीचे पैसे पिकअप गाडीत ठेवले. मात्र दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका चोरट्याने ते गाडीतून उडवले. त्या शेतकऱ्याने या घटनेची वणी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेज तपासून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोपेड वाहन जप्त करण्यात आले आहे.
घटना अशी आहे की, 8 फेब्रुवारीला कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी सचिन संजय देवतळे यांना कापूस विकून 90 हजार रूपये मिळाले. त्यांनी वणीच्या दीपक टॉकीज परिसरात पिकअप वाहन उभे करून गाडीच्या केबिनमध्ये पैसे ठेवले. मग चहापाण्यासाठी गाडीबाहेर गेले. परत येऊन बघितले असता पैसे दिसले नाही.
याबाबत सचिन यांनी वणी पोलिसात पैसे चोरी गेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 303(2) बिएनएसनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेज तपासून आरोपी नामे सागर अशोकराव घोसे (33) रा.अलीपूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा ह. मु. रामपूरा वार्ड, वणी यांस सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले 90 हजार रूपये व गुन्ह्यात वापरलेली मोपेड क्रमांक MH 29 CD 0317 किमत 60 हजार रूपये जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि धीरज गुल्हाने, वसीम शेख, निरंजन खिरटकर, गजानन कुडमेथे व मुनेश्र्वर खंडरे यांनी केली.
Comments are closed.