क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला क्रीडा महोत्सव

वणी नगर परिषदेचे य़शस्वी आयोजन, शाळा क्रं. 7 व 2 ला विजेतेपद

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगर परिषद अंतर्गत आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्यात. या स्पर्धांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 ने उच्च प्राथमिक गटात व छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 2 ने प्राथमिक गटात विजेतेपद पटकाविले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये या स्पर्धा झाल्यात. क्रीडास्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, क्रीडा महोत्सवाचे आयोजक तथा मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्यासह मंचावर नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक वसंत आडे, दिलीप कोरपेनवार केंद्र समन्वयक, चंदू परेकर, पालक किशोर चांदेकर हे उपस्थित होते.

दिनांक 5 फेब्रुवारीला स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. दिनांक 6 फेब्रुवारीला वणी नगर परिषदमध्ये कार्यरत शिक्षक, कर्मचारी व शाळा क्रं. 7 च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. दिनांक 7 फेब्रुवारीला जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.

दिनांक 8 फेब्रुवारीला झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रास्ताविक भाषणातून झालेल्या क्रीडा महोत्सवाचा आढावा गजानन कासावार यांनी घेतला. त्यानंतर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी नगर परिषदेतील विद्यार्थी व कार्यक्षम शिक्षकांची प्रशंसा केली. या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. शाळा क्रं. 7ची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी आणण्याचे वचन दिले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी मागील चार दिवसांपासून या खेळाच्याच मैदानावर उपस्थित राहून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधता आल्याचा आनंद व्यक्त केला.

कबड्डी, खो खो, लंगडी या खेळात अ व ब गटांमध्ये सांघिक स्पर्धांसोबतच लांब उडी, उंच उडी अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. उच्च प्राथमिक गटात विजेतेपद शाळा क्रमांक 7 ने तर उपविजेतेपद शाळा क्रमांक 8 ने पटकाविले. प्राथमिक गटात विजेतेपद शाळा क्रमांक 2 ने तर उपविजेतेपद शाळा क्रमांक 7 ने पटकाविले आहे. या सर्व संघाना अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात क्रीडा सचिव विजय चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन शिक्षक दिगंबर ठाकरे व देवेंद्र खरवडे यांनी केले. आभार केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी मानले. या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, सोनू लांडे, पूजा कुमरे, सौरभ बहादे यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.