राजूर कॉलरीतील ‘त्या’ खून प्रकरणाचा एका वर्षाने सुटला तिढा

अनैतिक संबंधातून झाला होता मागील वर्षी खून

विवेक तोटेवार, वणी: मागील वर्षीचा धुलिवंदनाचा दिवस होता. सगळे या उत्सवात रमले होते. त्यात ऐन सणाच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2024ला एक धक्कादायक सत्य उडकीस आलं. नजिकच्या राजूर कॉलरी येथील एका विहिरीत नामदेव पोचम शनुरवार (50) यांचा कुजलेला मृतदेह आढळला. पोलीस घटनास्थळी पोहचलेत. त्यांनी प्रकरणाचा तपास केला. तेव्हा ही आत्महत्या नसून खून असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या खून प्रकरणात एका बाईसोबत मृतकाचे संबंध असल्याने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, 25 मार्च 2024 रोजी राजूर येथे एक प्रेत विहिरीत आढळले. त्यानंतर राजुर कॉलरीतील वार्ड नंबर 3 मधील थॉमस माणिक कोमलवार (35) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वणी येथे मर्ग दाखल करण्यात आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांचे बयाण घेतल्यानंतर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. चौकशीनंतर मृतक नामदेव पोचम शनुरवार यांचे एका महिलेसोबत अनैतिक सबंध असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरविले. तिन्ही संशयित आरोपी हे राजूर कॉलरीचे होते.

पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली. आरोपीने मृतक नामदेव पोचम शनुरवार यांच्या अनैतिक संबंधाबद्दल सांगितले. या संदर्भात या आरोपीने नामदेव यांच्या नातेवाईकांना समजून सांगितले असता ऐकत नसल्याचे म्हटले. त्यामुळे या तीन आरोपींनी नामदेव यास जिवे मारण्याचा प्लॅन केला.

या तपासात नामदेव यांची बहीण शोभा शंकर अडकिलवार यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. त्यांच्या जबाबाबनुसार 11 फेब्रुवारी 2025 रोजी एक इसम त्यांच्या घरी चहा घेण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने सांगितले की, आरोपीने त्याला सांगितले होते की, तो व त्याचे सोबत अन्य दोघे असे तिघांनी मिळून नामदेव पोच्चम शेनुरवारला मारण्याचा प्लॅन केला. एका आरोपीने नामदेवला दारु पाजली. त्याला राजूर रेल्वे पटरीकडे घेऊन आला.

या तिघांनी नामदेवला लाथाबुक्याने मारहाण केली. त्यांना उचलून विहीरीत टाकले. शिवाय एक आरोपी हा शोभाला धमकी देत होता. परंतु शोभा भितीने त्याला काही बोलत नव्हती. परंतु त्यांना जेव्हा ही बाब कळली, तेव्हा शोभा यांनी तीन आरोपींविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दिली.

शोभा यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 302, 201, 34 भा. दं. वि.प्रमाणे 11 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि नीलेश अपसुंदे, अविनाश बानकर, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, रितेश भोयर (राजुर बीट ) यांनी केला.

Comments are closed.