विवेक तोटेवार, वणी: त्याचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही गोडीगुलाबीने राहत होते. मात्र संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच. पुढे चालून नवरा-बायकोमधली मतभेदांची दुरी वाढतच गेली. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून वणी तालुक्यातील गाडेघाट येथील संदीप येरगुडे (40) याने आपली जीवनयात्रा संपवली.
मात्र मरणापूर्वी त्याने सुसाईड नोट आपल्याजवळ एका वहीत लिहून ठेवली. एवढेच नव्हे तर आत्महत्या करण्यापूर्वी संदीपने काही फोटो सोशल मीडियावरतीही शेअर केले होते. त्यात सासरच्या सहा जणांचा उल्लेख केला. त्यात सासरा गजानन मारुती माथुलकर, सासू उषा, साळा सूरज माथुलकर व अजय माथुलकर, साळी कविता श्रीकांत निखाडे व तिचा पती श्रीकांत निखाडे यांची नावे आहेत.
संदीपच्या मारेगाव येथील योगिता मनोज भोपळे या बहिणीने पोलिसात तक्रार दिली. आणि पुढील कारवाईला वेग आला.सततचे वाद, कौटुंबिक तणाव व सासरकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, होणारा छळ आणि मारहाण असह्य झाल्याने संदीपने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
संदीप 7 जानेवारीपासून बेपत्ता होता. मात्र 9 जानेवारीला गावाजवळील जंगलात एका झाडाला गळफास घेतलेला त्याचा मृतदेह आढळला. संदीप आणि सविताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नेहमीच्या वादविवादामुळे सविता आपल्या मुलांसह माहेरी राहत होती. संदीप काही महिन्यांपूर्वी सासुरवाडीला चंद्रपूर जिल्ह्यातील सिदूर येथे गेला.
तिथे गेल्यावर सासरच्या मंडळींनी त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केल्याचेही बोलले जात आहे. याच कारणामुळे संदीपने आत्महत्या केल्याची केल्याची चर्चा आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार मुकुटबन पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.