बहुगुणी डेस्क, वणी: जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवंत धावून येतात. भक्तांच्या सुखदु:खात परमेश्वर सहभागी होतो असा भक्तांचा विश्वास असतो. गुरुवारी ऋषिपंचमी, म्हणजेच संत गजानन महाराजांचा प्रकटदिन. त्या निमित्त वणी शहरासह इतरत्रही विविध कार्यक्रम होत आहेत.
रविनगराजवळील जिजाऊनगरातील मंदिरातून पालखीयात्रा निघाली त्यात चक्क ‘विठ्ठल-रुक्मिणी’ने सहभाग दर्शविला. ‘विठ्ठल-रुक्मिणी’च्या आकर्षक वेशभूषेतल्या दोन महिलांनी त्या शोभायात्रेत एक वेगळं आध्यात्मिक वातावरण तयार केलं. त्या ठिकाणी पूर्वसंध्येला मोझरी येथील हभप प्रज्वल महाराज यांचं कीर्तन झालं. अभिषेक, पूजन, परिसर स्वच्छता, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि भजन झालं.
सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय बाबू चोरडिया यांनी स्वखर्चातून घोन्सा येथील संत गजानन महाराज मंदिराला आकर्षक आणि भव्य प्रवेशद्वार बांधून दिले. या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला झाला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष दिलीप काकडे आणि हजारो भक्त उपस्थित होते.
अगदी भल्या पहाटे संत गजानन महाराजांची पालखी रामधून परिवाराने टागोर चौकातून काढली. यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरासमोरील मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रम सुरू झालेत. जैताई भजनमंडळाने आपली भजनसेवा दिली. पूर्वसंध्येला अजित खंदारे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री श्रीपाद भजन मंडळाचे भजन होईल.

रंगनाथ स्वामी मंदिरातही संत गजानन महाराजांचे विधिवत पूजन झाले. आरती आणि तीर्थप्रसादाचे वितरण झाले. वणी नगर पालिकेमागील मंदिरात दिवसभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेत घोन्सा येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी त्याठिकाणी पूजन केले. मेंढी दिग्रस येथील हभप भागवताचार्य विजय महाराज गव्हाणे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. दिनांक 14 ते 21 फेब्रुवारीपर्यंत हा प्रगटदिन महोत्सव चालणार आहे.

वणी शहरात रात्री आकर्षक अशी शोभायात्रा निघाली. यात जवळपास २० भजनीमंडळांचा सहभाग होता. हे आयोजन ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज उपासना मंडळानं केलं होतं.
Comments are closed.